२६ मे रोजी दहिसरच्या विद्यामंदिर शाळेत डॉ. गौरी माहुलीकरांचे आदी शंकराचार्यांच्या “आत्मषटकम्” वर व्याख्यान झाले. आणि नुकताच त्यांनी केरळातील वेलियानाड या गावी उभारल्या जात असलेल्या युनिव्हर्सिटीत डीन ऑफ फॅकल्टी म्हणून कार्यभार सांभाळला त्याबद्दल त्यांचा सत्कार सोहळाही पार पडला. दहिसरमधील संस्कृतप्रेमींची “संस्कृतार्णव” ही संस्था, संस्कृतभारती, संस्कृतभाषा संस्था आणि विद्यामंदिर यांनी एकत्र येऊन आयोजिलेला हा अतिशय रेखीव आणि नेटका असा कार्यक्रम होता. संस्कृतार्णवच्या श्री. तन्ना सरांनी करून दिलेली संस्थेची यथोचित ओळख, कौस्तुभ यांचे सुरेख निवेदन, डॉ. भालचंद्र नाईक यांनी माहुलीकरमॅडम यांचा करून दिलेला हृद्य परिचय, त्यानंतर माहुलीकर मॅडमचे आत्मषटकम् वरील व्याख्यान असा हा कार्यक्रम रंगत गेला. त्यानंतर सत्कारसोहळा झाला. त्यात माहुलीकरमॅडमना चाफ्याच्या फुलाची परडी आणि केशराच्या अत्तराची कुपी देण्यात आली. या सुगंधी वस्तु त्यांना देण्यात आल्यावर सत्काराला उत्तर देताना माहुलीकरमॅडमनी जे भाषण केले त्याला घरगुती गंध लाभला होता. आयुष्यातील सुरुवातीचे दिवस, चिन्मय मिशनशी त्यांचे असलेले नाते, शंकराचार्यांचा त्यांच्यावरील प्रभाव याबद्दल बोलण्यात त्या रंगून गेल्या होत्या. शेवटी डॉ. सुनिता पाटील यांनी आभार प्रदर्शन केले. त्यात त्यांनी माझाही नामोल्लेख करून कोपर्यात बसण्याची सवय असलेल्या माझ्यासारख्याची अवस्था अवघड करून टाकली. एकंदरीत एका परीपूर्ण कार्यक्रमाला हजर राहण्याची संधी मिळाली.
मी राह्तो ती जागा दहिसर बोरिवलीपासून बर्यापैकी दूर. दहिसर बोरिवली भागात संस्कृतप्रेमी अनेक कार्यक्रम करतात. तरीही अंतरामुळे जाता येत नाही. पण चार संस्थांनी एकत्र येऊन केलेला माहुलीकरबाईंचा सत्कार, त्यातून त्या स्वतः त्यांचे जे आराध्य दैवत शंकराचार्य, त्यांच्या आत्मषटकावर बोलणार, शिवाय वयाच्या पासष्टाव्या वर्षी त्या नवीन संस्था वसवायला निघालेल्या म्हणूनही त्यांना पाहण्याची उत्सुकता या सर्वांचा परिणाम म्हणून हा कार्यक्रम टाळण्याचा वेडेपणा सुदैवाने माझ्या हातून घडला नाही. आणि गेल्याचं सार्थक झालं. तसंही संस्कृत जगतात स्त्रियांचंच प्राबल्य. त्यामुळे कुठल्याही कार्यक्रमाला वातावरण एकदम रंगीबेरंगी असतं. एखाद्या उत्सवाला आल्यासारखी मंडळी सजलेली असतात, एकमेकांना गजरे देण्याचे माळण्याचे कार्यक्रम सुरु असतात. आणि उत्सवाचं वातावरण का नसावं? कार्यक्रम कुठलाही असु देत. सर्वांनी मिळून त्या देववाणीची पुजाच तर बांधलेली असते. बाकी ही सर्व खर्या अर्थाने संस्कृतच्या प्रेमात पडलेली मंडळी. कुणी पाणिनीच्या अष्टाध्यायीत गढलेला तर कुणी वेदान्त्ताच्या गहन तत्त्वांमध्ये मुशाफिरी करण्यात मश्गुल. कुणी कालिदासाच्या मेघदूतावर बोलता बोलता अत्यानंदाने स्तब्ध होणारे तर कुणी शंकराचार्यांच्या स्मरणाने गहिवरणारे. ही अशी प्रेमात पडलेली मंडळी मला नुसती पाहायलाही आवडतात. आमच्याकडे मार्क्सच्या प्रेमात असलेली मंडळी जशी त्याच्या प्रेमात नसलेल्यांवर दात ओठ खात धावून जातात तशी भानगड येथे नसते.शिवाय आमच्या समाजशास्त्रात अभावानेच दिसणारे असे सकारात्मक वातावरण येथे असल्याने मी एकदम रिलॅक्स असतो. अशा सुरेख वातावरणात माहुलीकरबाई बोलायला उठल्या.
माहुलीकरबाईंनी मूळ गोष्टीपासून सुरुवात केली. आदी शंकराचार्य जेव्हा आठ वर्षाचे बटु होते. आपल्या गुरुच्या शोधात नर्मदातटी आले असता त्यांना गोविंदयतींनी किंवा कुणा मुनींनी “तु कोण आहेस” हे विचारले. त्यावेळी या आठवर्षाच्या बटुने उत्तरादाखल जे सहा श्लोक म्हटले तेच आत्मषटक अथवा निर्वाण षटक म्हणून प्रसिद्ध पावले. त्यातील प्रत्येक श्लोकाच्या शेवटी असलेले “चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम्” हे पालुपद तर बहुतेकांना माहित असेल. माहुलीकरमॅडमनी या सहा श्लोकांचा अर्थ काय सांगितला यापेक्षा या एकंदरीत आत्मषटकाबद्दल त्या काय बोलल्या याबद्दल येथे लिहावे असे मला वाटते. कारण बाई जेव्हा बोलतात तेव्हा बहुतेकवेळा त्या संशोधक, शिक्षक आणि आस्वादक या तिन्ही भुमिकेतून बोलत असतात. केवळ भक्ताच्या भूमिकेत त्या क्वचितच कधी असाव्यात अशी माझी नम्र समजूत आहे. चर्चेच्या ओघात संस्कृतमध्ये स्त्रियांना वेदाध्ययनाचा अधिकार नाही या संकेताचा स्वतःला कसा अनुभव आला हे त्यांनी स्वच्छपणे सांगितले. सुरुवातीला त्यांनी या स्तोत्राची पूर्वपिठिका सांगितली. आचार्यांनी विपुल लेखन केले. त्या लेखनात त्यांनी आवड निवड आणि बुद्धी यांचा विचार करून अधिकारीभेदाप्रमाणे आपल्या साहित्याची निर्मिती केली. सर्वसाधारण माणसांसाठी स्तोत्रग्रंथ, मध्यमाधिकार्यांसाठी प्रकरण ग्रंथ आणि उत्तमाधिकार्यांसाठी भाष्य अथवा टिकाग्रंथांची निर्मिती झाली. आत्मषटकाचा समावेश स्तोत्रग्रंथात होतो. हे आत्म्याविषयीचे स्तोत्र आहे. आत्मा कसा आहे, कसा नाही याचे सहा श्लोकात विवेचन यात केले आहे म्हणून आत्मषटक. याचे दुसरे नाव निर्वाणषटक. त्या नावाविषयी सांगताना बाईंनी निर्वाण शब्दाबद्दल सविस्तर माहिती दिली. पुढे त्या म्हणाल्या या स्तोत्राने दु:ख, क्लेश आणि बंधनांपासून मुक्ती मिळते म्हणून हे निर्वाणषटक. स्तोत्रसाहित्याबद्दल काही माहिती दिल्यावर त्या मूळ विषयाकडे वळल्या.
त्यांनी आपल्या प्रेझेंटेशनमध्ये श्रीमती अरुंधती दिक्षित यांची मराठीतील रसाळ समश्लोकी दिली होती. त्याचा त्यांनी अतिशय कृतज्ञतेने उल्लेखदेखिल केला.आणि त्यांची वाग्धारा सुरु झाली. त्यात श्लोकाचा मूळ अर्थ आणि त्याचे स्पष्टीकरण तर होतेच पण त्याच बरोबर येथे आचार्यांची भूमिका काय आहे याचा सविस्तर उहापोह होता. विद्याप्राप्तीचे सुरेख साधन म्हणून त्यांनी त्यांच्या आवडत्या अरुंधतीदर्शनन्यायाची चर्चा केली. स्थूलाकडून सूक्ष्माकडे कसे जावे याचा तो एक सुंदर वस्तुपाठ होता. अरुंधतीची चांदणी दाखवताना आधी सर्वसाधारणपणे लगेचच दिसेल असा तारकापुंज दाखवायचा, त्यानंतर त्याच्या बाजुला, त्याच्या वर, त्याच्या डावीकडे, उजवीकडे असे क्रमाक्रमाने सूक्ष्म सूक्ष्मतर तारका दाखवत शेवटी अरुंधतीपर्यंत पोहोचवायचे अशी प्राचीनांची अत्यंत विज्ञाननिष्ठ अशी पद्धत होती. या क्रमाचे वर्णन करीत असताना मार्मिक टिप्पणी करीत त्या म्हणाल्या एखादी गहन गुढ गोष्ट सांगताना ती काय आहे त्यापेक्षा ती काय नाही हे सांगणे तूलनेने जास्त सोपे. आत्मषटकात आचार्यांनी आत्मा काय नाही याबद्दल सांगुन तो काय आहे यापर्यंत जिज्ञासुला नेले आहे. पुढे माहुलीकरबाईंनी आचार्य आपल्या पूर्वसूरींच्याही असे पुढे गेले याचे वर्णन केले. हा संदर्भ पंचकोशांच्या बाबतीतला होता. आणि येथे बाईंनी “अर्धजरती” न्यायाचा उल्लेख केला.
दुसर्या श्लोकातील (न च प्राणसंज्ञो न वै पञ्चवायुः न वा सप्तधातुर्न वा पञ्चकोशः। न वाक्पाणिपादं न चोपस्थपायुः। चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम्॥२॥) पञ्चकोशांबद्दल बोलताना त्या म्हणाल्या की आचार्यांचे पूर्वसूरी पाचवा जो आनंदमयकोश म्हणजेच आत्मा येथपर्यंत येऊन थांबले. मात्र “मय” प्रत्यय हा विकारार्थी असल्याने अन्नमय, प्राणमय, मनोमय, आणि विज्ञानमय असे आधीचे चार कोश म्हणजे आत्मा नाही म्हणून बाद केले असता आनंदमय कोश म्हणजे आत्मा कसा असेल असा प्रश्न उत्पन्न झाला. तेव्हा आधीच्या “मय” प्रत्ययाचा अर्थ म्हणजे “विकार” आणि आनंदमयकोशाच्यावेळी “मय” प्रत्ययाचा अर्थ म्हणजे “प्राचूर्य” असा परंपरेने सांगण्यात आला. आचार्यांनी अर्थ लावण्याच्या या पद्धतीला विरोध केला. आधीच्या चार कोशांच्या बाबतील विकारी म्हणून घेतलेला अर्थ आनंदाच्या बाबतील प्राचूर्य असा घेणे म्हणजे त्यांना अर्धजरती” न्यायाप्रमाणे वाटले. स्त्री एकतर तरूण असेल अथवा वृद्धा असेल. ती दोन्ही एकाचवेळी असणे कसे शक्य आहे? शिवाय आनंदमय म्हणजे आनंदाचे अधिक्य किंवा प्राचूर्य म्हणता येईल. पण “प्राचूर्य” याचा अर्थ फक्त आनंद असा होत नाही. आनंदाचे अधिक्य असा होतो. तेथेही काहीतरी उणीव असल्याची जाणीव आहेच. आणि आत्मा तर आनंदमय नसून केवळ आनंदच आहे. म्हणून आनंदमयकोश म्हणजेदेखील आत्मा नाही असे या दुसर्या श्लोकात आचार्य म्हणतात.
पुढच्या श्लोकाबद्दल बोलताना बाईंनी आत्मा द्वंद्वातीत कसा आहे याचे विवेचन केले. आत्म्याला राग, द्वेष, लोभ, मोह, सुख दु:ख यांचा स्पर्श तर होत नाहीच. पण तो चारही पुरुषार्था पलिकडला आहे. धर्म, अर्थ, काम तर राहिलेच पण आत्मा हा मोक्षा पलिकडला आहे असे विवेचन करताना बाई म्हणाल्या की आत्मा हा मुक्तच असल्याने त्याला वेगळा असा मोक्ष कुठला? हे सांगतानाच आत्मा हा वेदस्वरूपही नाही यावर त्यांनी सुरेख टिप्पणी केली. काशीस जायचे असेल तर साधन हवे. पण त्या साधनांची मातब्बरी काशीस पोहोचेपर्यंतच, तेथे पोहोचल्यावर ती साधने टाकून आपल्या साध्याकडे लक्ष केंद्रित करावे लागते. त्याचप्रमाणे वेद हे आत्म्याकडे पोहोचविण्याचे साधनमात्र आहेत. ते म्हणजे आत्मा नाही. नित्यस्वरुप आत्म्याला वेदराशींची आवश्यकता नाही. त्याचप्रमाणे यज्ञयाग हे ऐहिक, पारमार्थिक लाभासाठी आहेत. आत्म्याला त्यांची काय गरज? ज्याला जन्म आहे त्यालाच मृत्यु आहे. आत्मा तर अजन्मा आहे. आणि जन्म मृत्युच नाही तर माता पिता, बन्धु, मित्र, गुरु शिष्य ही नाती तरी कशी असणार? अशा तर्हेने एकेका श्लोकाचा परामर्श घेत माहुलीकरबाईंनी आत्मषटकाचे आपले विवेचन संपवले. त्या वर्गात शिकवत असताना जसे सर्वजण मुग्ध होत असत तशीच आजही अवस्था झाली होती. या नंतर सत्कार सोहळा झाला. आणि सर्वांचे यथोचित मनोगत झाल्यावर सत्काराला उत्तर देण्यासाठी बाई उठल्या. माझा या कार्यक्रमाला येण्याचा पहिला उद्देश माहुलीकरबाईंचे आत्मषटकावर व्याख्यान ऐकणे हा होता. आताच्या त्यांच्या भाषणाने दुसरा उद्देश पूर्ण झाला. त्यांचे हे मनोगत मात्र संशोधक, प्राध्यापिकेपेक्षा आचार्यांविषयीच्या भक्तीने ओतप्रोत भरलेल्या एका भक्ताचे होते.
यावेळी बोलताना त्या भूतकाळातील स्मरणरंजनात रंगून गेल्या होत्या. एल्फिस्टन कॉलेजमध्ये असताना चिन्मयमिशनशी आलेला संबंध, कॉलेज पूर्ण करत असतानाच त्यांनी चिन्मयानंदांची ऐकलेली व्याख्याने. त्यांचा बाईंवर पडलेला प्रभाव यावर त्या बोलल्या. शेवटी आपले आराध्य दैवत असलेल्या शंकराचार्यांविषयी बोलताना त्यांनी एक आठवण सांगितली. ही आठवण त्यांनी माझ्याशी संस्कृतभवनात बोलतानाही सांगितली होती. आणि मला नीट आठवते आहे की ती सांगताना माहुलीकरबाईंच्या डोळ्यात पाणी तरळले होते. आपल्या परंपरेत ज्या देवाचा भक्त ध्यास घेतो, त्याच्या भक्तीवर प्रसन्न होऊन तो देव त्याला कुणाच्या न कुणाच्या स्वरुपात दर्शन देतो, त्याला मार्गदर्शन करतो, त्याच्या इच्छा पूर्ण करतो, त्याला आपले निकटचे सानिध्य देतो हे सांगणार्या असंख्य कथा आहेत. तसेच काहीचे बाईंच्या बाबतीतही घडले आहे. त्या शृंगेरी येथे मठात गेल्या असताना एका गृहस्थाने त्यांना कसलिही कल्पना नसताना त्यांची शंकराचार्यांशी प्रत्यक्ष भेट घडवून दिली. त्यावेळी बोलताना विवेकचूडामणीवरील टिकाग्रंथ उपलब्ध नाही आणि तो आपल्याला हवा होता असे त्या बोलून गेल्या. ग्रंथ लिहिण्यास सुरुवात झाली होती मात्र त्याचे फक्त सातच श्लोक लिहून झाले आहेत, तो अपूर्ण राहिला आहे इतकीच माहिती बाईंना होती. मात्र आचार्य म्हणाले ग्रंथ पूर्ण झाला आहे. हे ऐकल्यावर बाईंना अर्थातच तो पाहण्याची इच्छा झाली. आणि काय आश्चर्य. खुद्द आचार्यांच्या हस्ते तो ग्रंथ बाईंना भेट म्हणून मिळाला. शंकराचार्यांचा कृपाप्रसादच जणु त्यांना प्राप्त झाला. चिन्मयमिशनचेही तसेच. कित्येक वर्षापूर्वी बाई प्राध्यापक म्हणून कार्यरत असताना या मिशनने त्यांना आपल्यासोबत काम करण्यास सुचवले होते. मात्र तेव्हा त्यांना ते जमले नाही. प्राध्यापक पदावरून अवकाश घेतल्यावर मिशनने त्यांना आपल्या वेलियानाड येथे उभारल्या जाणार्या युनिव्हर्सिटीत काम करण्यास बोलावले. आज त्या सुरेख गावात बाई शंकराचार्यांच्या जन्मस्थानी जाऊन बसतात. निवांतपणे ध्यान लावतात. आजन्म ज्यांचा ध्यास घेतला त्या आदिशंकराचार्यांच्या इतक्या निकट राहून सेवा करण्याचे भाग्य त्यांना लाभले आहे. बाईंनी आपले मनोगत संपवले.
कार्यक्रम संपल्यावर माहुलीकर बाईंच्या अवतीभवती गर्दी जमली होती. भातखंडे सरांनी माहुलीकरबाईंचे वर्णन “या गौरी सर्व छात्राणां स्फूर्तीरूपेण संस्थिता” असे केले होते. त्या स्फूर्तीरुप देवतेचे आशीर्वाद आपल्याला मिळायला हवेत असे वाटले. मी जाऊन त्यांच्या पायांना स्पर्श करून नमस्कार केला आणि बाहेर पडलो.
अतुल ठाकुर
Be the first to comment