आधुनिक संस्कृत काव्य – डॉ. कमल अभ्यंकर

आधुनिक संस्कृत काव्य या विषयावर आज डॉ. कमल अभ्यंकर यांचे व्याख्यान ऐकण्याचा योग आला. या अगोदर त्यांचे व्याख्यान एशियाटिक सोसायटीत ऐकले होतेच. ते काव्यमीमांसाकार राजशेखरावर होते. आज आधुनिक संस्कृत काव्याच्या संदर्भात त्या स्वतःच्याच संस्कृत काव्याबद्दल बोलणार होत्या. आपल्या कवितेवर स्वतःच कवीने बोलणं हा एक दुर्मिळ योग असतो आणि त्यातुन संस्कृतात काव्य करणार्‍या विदुषिला आपल्याच काव्यावर बोलताना, त्याची पार्श्वभुमी सांगताना ऐकायला मिळणं हे आणखिनच दुर्मिळ. संस्कृतातले सर्व प्रतिभावंत हे प्राचिन आहेत. त्यामुळे हा एक वेगळा अनुभव होता. डॉ. कमल अभ्यंकर यांच्याबद्दल जवळिक वाटण्याचे आणखि एक कारण म्हणजे त्यांचा कमालिचा नम्र स्वभाव. काहीजणांना ऐकताना त्यांच्या विद्वत्तेचं दडपण आपल्याला जाणवतं. डॉ. सरोज देशपांडेंना ऐकताना तसं वाटलं होतं. पण कमल अभ्यंकरांना ऐकताना मनावर ताण नसतो. आपल्याच घरातली कुणीतरी थोरली, प्रेमळ आणि विद्वान व्यक्ती बोलते आहे असं वाटतं. मात्र त्या बोलायला लागल्या कि पांडित्य आणि विद्वत्ता लपत नाही. आज तर जेव्हा त्या आपल्या कवितेची पार्श्वभुमी सांगत होत्या तेव्हा नैसर्गिक प्रतिभेच्या अविष्काराचा आणखि एक पदर त्यांच्या बद्दल वाटणार्‍या आदराला जोडला गेला.

कमल अभ्यंकरांची पीएचडी राजशेखराच्या काव्यमीमांसेवर आहे. ज्याला राजशेखराच्या काव्यमीमांसेचा अभ्यास करायचा आहे त्याला त्यावरील कमल अभ्यंकरांचे पुस्तक टाळुन चालणार नाही अशी परिस्थिती आहे. बाई कुठल्याही विषयावर बोलत असल्या तरी राजशेखराचे संदर्भ आपोआपच त्याच्या बोलण्यात येत असावेत. आजचे व्याख्यानही त्याला अपवाद नव्हतेच. अधुनमधुन काव्यमीमांसा, राजशेखर, त्यांने सांगितलेले कवींचे प्रकार, त्याची विदुषि, कवयित्री पत्नी अवन्तिकासुंदरी यांचा संदर्भ देत बाईंनी सुरुवातीपासुनच्या संस्कृत कवयित्रींचा धावता आढावा घेऊन आपल्या काव्यावर बोलण्यास सुरुवात केली. त्यांच्या काव्यमीमांसेवरील पुस्तकाशी माझा थोडासा परिचय असल्याने त्या देत असलेले संदर्भ लक्षात येत होते. संगीत हा त्यांचा श्वास आहे असे त्या म्हणाल्या. आता वयोपरत्वे त्या गात नाहीत. मात्र गाणं त्यांच्या मनात सतत रुंजी घालत असतं. काहीही करताना आणि काही करत नसताना मनात गाणं हे असतंच असं त्या म्हणाल्या. अशातर्‍हेने स्वतःबद्दल सांगत त्यांनी आपल्या संस्कृत कवितांचे वाचन केले. हा लेख लिहिताना माझ्यासमोर त्यांच्या कविता नाहीत. त्यामुळे त्याबद्दल सांगता येणार नाही. मात्र त्या वाचत असलेल्या कवितांच्या विषयातील वैविध्य मात्र विसरता येणार नाही असे होते.

त्यांनी काही हळुवार, नाजुक विषय हाताळले. हेच विषय कवींनी हाताळले असते तर कदाचित वेगळ्या स्वरुपात पुढे आले असते. मात्र स्त्रीकडुन जेव्हा अशा विषयांवर काव्यरचना घडते तेव्हा सहसा न दिसलेल्या गोष्टी दिसतात. रामायणातील वनवासाच्या प्रसंगावर आधारित त्यांनी लक्ष्मणाची पत्नी उर्मिलेवर काव्य केले आहे. सीता जरी वनात जात असली तरी तिचा पती राम तिच्या बरोबर आहे. आपण मात्र राजप्रासादात पतीशिवायच वनवास भोगणार आहोत अशी खंत उर्मिलेच्या मनात आहे. लक्ष्मण तिची समजुत काढत आहे. तुला जरी माझ्यासोबत येता आलं नसलं तरी तुझी जबाबदारी राजस्नुषा म्हणुन फार मोठी आहे आणि हे उत्तरदायित्व तुला पार पाडायचं आहे असे तो म्हणतो. अशीच एक कविता द्रौपदीबद्दल. तिचे मन अर्जुनावर आले आहे. मात्र कुंतीमुळे तिला पाच जणांची पत्नी व्हावे लागले आहे. याची तिला खंत वाटते आहे. कमल अभ्यंकरांना भवभूतीबद्दल वाटणार्‍या अपार आदराचा उलगडा येथे होतो. उत्तररामचरितात भवभूतीने वाल्मिकिंचा राम स्विकारला नाही. राम सीतेचे मिलन करुन त्याने आपल्या काव्यात सीतेला काव्यगत न्याय मिळवुन दिला. त्याचप्रमाणे कमल अभ्यंकरांनी देखिल आपल्या कवितांमध्ये परंपरेपेक्षा वेगळा दृष्टीकोण आपल्या काव्यात मांडला.

या महाकाव्याप्रमाणेच त्यांनी विनोद हा प्रकारदेखिल हाताळला. भवगीत, देशप्रेमपर काव्य अशा अनेक कविता त्यांनी लिहिल्या. बाबासाहेब आंबेडकरांवरदेखिल त्यांनी संस्कृतात काव्य लिहिले. गाण्याचे अंग आणि शिक्षण असल्याने पुढे त्यांनी काही बंदिशी संस्कृतात लिहिल्या. हा त्यांचा प्रवास सांगताना माझे लक्ष त्यांच्या प्रतिभाविष्काराबद्दल त्या काय सांगताहेत त्याकडे होते. त्यासंदर्भात ज्यातर्‍हेने त्यांनी विवेचन केले त्यावरुन राजशेखराच्या मताप्रमाने मला त्या “सहजा” प्रतिभेच्या धनी वाटल्या. पुढे त्यांनी आपल्या अभ्यासाने त्या प्रतिभेला आणखि तेजाळले असेल पण ती उपजत देणगी त्यांना होती हे नक्की. माहिमला राहणार्‍या डॉ. कमल अभ्यंकरांना चर्चगेटला अध्यापनासाठी जाताना प्रवासात संस्कृत काव्य स्फुरत गेले हा मला तरी चमत्कारच वाटला. एका काव्यात त्यांनी गाडीसमोर आलेल्या कुत्र्याचा उल्लेख केला आहे. आयुष्यभर संस्कृतचे अध्यापन केलेल्या बाईंचा अर्थातच वेदवेदान्ताचा गाढा अभ्यास असणारच. प्रत्येकात तोच आत्मा आहे आणि हे एकत्व सांगणार्‍या वेदान्तांचे तत्वज्ञानच त्यांनी त्या अपघाताद्वारे आपल्या कवितेत मांड॑ले. आपला आणि कुत्र्याचा आत्मा एकच आहे मात्र त्या कुत्र्याचं काय झालं याचा विचार गाडीतल्या कुठल्याच प्रवाशाच्या मनाला शिवला नाही.

आपल्या तत्त्वज्ञानात, संस्कृतात मोक्ष, अपवर्गाचे महत्त्व अपार. मात्र कमल अभ्यंकरांनी आपला वेगळा बाणा येथेही जपला. एका कवितेत त्या म्हणतात मला मोक्ष, अपवर्ग काहीही नको कारण मला जीवनाबद्दल आसक्ती आहे. आणि माझी प्रतिभा तर मला परमेश्वरानेच तर दिली आहे. तेव्हा त्या प्रतिभेचा वापर करुन जे काव्य निर्माण होत आहे ती देखिल त्याची उपासनाच आहे. अतिशय प्रेमाने आपण एखादे फुल परमेश्वराला अर्पण करावे त्याप्रमाणे त्या आपले काव्य परमेश्वराला अर्पण करुन त्याची भक्ती करतात. व्याख्यानाच्या शेवटी त्यांनी आपला एक कार्यक्रम पडद्यावर दाखवला. त्यात त्यांच्या संस्कृत काव्याला स्वरसाज चढवला होता आणि ते गायिले गेले होते. त्यात एक लावणीदेखिल होती. व्याख्यानात कमल अभ्यंकरांनी अनेक किस्से सांगितले. डॉ. मो. दि. पराडकरांसारख्या ज्येष्ठ संस्कृत विद्वानांच्या स्मरणाचा सुगंध या आठवणींमध्ये मिसळला होता. व्याख्यानामध्ये एक बाब मला समाजशास्त्राचा विद्यार्थी म्हणुन जाणवली जी या लेखाचा समारोप करताना सांगाविशी वाटते.

आमच्याकडे समाजशास्त्रात मार्क्सवादी कायम विद्वत्तेचा मक्ता घेतल्याप्रमाणे वागत असतात. सेमिनार्समध्येतर त्यांची गुंडगिरी जास्तच जाणवते. या पार्श्वभुमीवर मला Pierre Bourdieu नावाच्या फ्रेंच समाजशास्त्रज्ञाने कल्चरल कॅपिटलची संकल्पना मांडली ती आठवली. त्यानुसार एखाद्या विद्येतील पारंगतता ही दुसर्‍याचे शोषण करताना वापरली जाते. कारण समोरचा तुमच्याइतका त्या विद्येत पारंगत नसतो. कमल अभ्यंकरांना दोन वेळा त्यांच्या कवितेतील व्याकरणाची चूक काढुन ती कविता वाचण्याची परवानगी नाकारण्यात आली. आणि आश्चर्य म्हणजे नंतर पाहिल्यावर असे लक्षात आले कि भवभूतीसारख्यांनी अगदी तोच शब्द वापरला होता. मात्र नम्रतेची पराकाष्ठा करीत आपले व्याकरणाचे ज्ञान तोकडे आहे असे त्या आम्हा सर्वांसमोर म्हणाल्या. आणि म्हणुन त्यांनी त्या प्रसंगी कुणाशीही वाद घातला नाही. समाजशास्त्रातील मार्क्सवाद्यांची दादागिरीची परंपरा संस्कृतात व्याकरणवाल्यांनी चालवली आहे कि काय असं काही वेळा वाटुन जातं. मात्र शेवटी डॉ. कमल अभ्यंकरांच्या प्रतिभेपुढे ही सर्व दादागिरी फिकी पडली हे देखिल जाणवल्यामुळे त्यांच्याबद्दलचा मनात असलेला आदर द्विगुणित झाला हे नक्की.

अतुल ठाकुर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*