समाजशास्त्रातील प्रबंधाच्या निमित्ताने मुक्तांगणमध्ये सतत जाणे घडले. त्यावेळी मुक्तांगणच्या व्यसनमुक्तीच्या उपचारपद्धतीमध्ये योगाभ्यासाचा समावेश आहे असे कळले. मुक्तांगणच्या संस्थापक डॉ. अनिता अवचट या देखिल योगाभ्यास करणार्या होत्या असे डॉ. अनिल अवचटांच्या पुस्तकांमधून लक्षात आले. मला स्वतःला योगविद्येत रस आहे आणि जमेल तसा सराव करण्याचा माझा प्रयत्न असतो. मात्र ही गोष्ट निव्वळ आवडीच्या पातळीवर न ठेवता संशोधनाच्या पातळीवर न्यावी अशी इच्छा होती. प्रबंध पूर्ण झाल्यावर योग आणि व्यसनमुक्ती या विषयावर काही लिहावे असे वाटत होतेच. संस्कृतचा अभ्यासदेखिल सुरु झाला होता. अशावेळी आपण व्यसनमुक्तीसाठी जे काही लिहिणार आहोत त्याचा योगाशी सांधा जुळवून देणार्या संस्कृतमधील तज्ञ व्यक्तीची मदत घ्यावी असे वाटले आणि डॉ. वैशाली दाबके यांच्याशी परिचय झाला. संस्कृतमधील ज्ञानभांडारात जी असंख्य रत्नं आहेत त्यापैकी व्यसनमुक्तीसाठी उपयुक्त अशी आपण वेचून लोकांसमोर ठेवावीत या हेतूने या लेखमालेची सुरुवात केली आहे.
या लेखमालेसाठी ज्यांचे मार्गदर्शन मिळाले आहे त्या डॉ. वैशाली दाबके या स्वतः पीएचडीसाठी मार्गदर्शक म्हणून काम करतात. त्या योगमार्गाशी संबंधित आहेत. शिवाय संस्कृतमधील तज्ञ आहेत. हे सारे ज्या व्यक्तीत एकवटले आहे अशी व्यक्ती या लेखमालेसाठी मिळणे ही गोष्ट मला अतिशय महत्त्वाची वाटते. कारण काही वेळा वैद्यकिय क्षेत्रातील डॉक्टरांचे योगावरील बोलणे ऐकताना असं जाणवतं की यातली काही माणसे फक्त अंदाजा अंदाजानेच बोलत असतात. त्यांना योगाचा प्रत्यक्ष अनुभव अथवा सराव नसतो. मॅडमशी बोलताना मात्र त्यांचा योगाशी प्रत्यक्ष संबंध असल्याने त्या योगाच्या प्रायोगिक अंगाचा विचार व्यसनमुक्तीच्या संदर्भात करु शकतात. या लेखमालेत आम्ही चर्चा करून आसने, प्राणायाम, योगनिद्रा, आणि योगसूत्रामधील काही वेचक सूत्रे यावर लेख देण्याचे ठरविले आहे. उदाहरणार्थ, आसन हा विषय असल्यास त्याचा व्यसनमुक्तीशी असलेला संबंध, व्यसनमुक्तीसाठी प्रत्यक्ष कुठली आसने करता येतील, आणि त्याचे व्यसनमुक्तीच्या दृष्टीने होणारे परिणाम अशा तर्हेने तीन लेखांमध्ये एक विषय विभागला जाणार आहे.
योगाभ्यासाच्या बाबतीत पतंजलींनी दीर्घकाल, निरंतर आणि आदरसहित योगाभ्यास केल्याने तो दृढ होतो असे एका सूत्रात म्हटले आहे. त्यामुळे ज्यांना पहिल्याच दिवसापासून एकदम ध्यान आणि समाधी कशी लावावी याबद्दल काही वाचायचे असेल किंवा सिद्धी अथवा चमत्कारीक गोष्टींबद्दल या लेखामालेत वाचायला मिळेल अशी अपेक्षा असेल त्यांची येथे निराशाच होईल असे मला स्पष्टपणे सांगावेसे वाटते. शारीरिक स्तरावर, सर्वसामान्य माणसाला, व्यसनाच्या दलदलीतून बाहेर पडण्याची मनापासून इच्छा आहे, त्याला योगाभ्यासाने काय मार्गदर्शन मिळू शकेल हेच या लेखांमध्ये सांगण्याचा प्रयत्न आमचा प्रयत्न असेल.
येथे दिलेल्या माहितीचा आधार घेऊन ज्यांना तसा सराव करण्याची प्रेरणा होईल त्यांनी जवळच्या योगकेंद्रात प्रवेश घेऊन तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली सराव करावा अशी आमची कळकळीची विनंती आहे. याचे कारण अनेक वर्षांच्या व्यसनामुळे माणसाचे अतोनात शारीरिक, मानसिक आणि भावनिक नुकसान झालेले असते. अशावेळी, पुस्तके, लेख वाचून, टिव्हीवर पाहून काही करण्यापेक्षा योगशिक्षकाला गाठून, त्याला आपल्या व्यसनाची कल्पना देऊन सराव सुरु करणे हा उत्तम मार्ग आहे अशी आमची समजूत आहे. व्यसन थांबवताना त्रास देणारी विथड्रॉलची लक्षणे, व्यसनामुळे जडलेले मधुमेह, रक्तदाब, यकृताचे त्रास, उष्णतेचे विकार यांसारख्या अनेक आजारांवर वैद्यकिय उपचारांची आवश्यकता असते. अशावेळी मुक्तांगणसारख्या संस्था आणि या क्षेत्रातील तज्ञ डॉक्टरांची मदत घेणे योग्य असते.
व्यसनी माणसाने व्यसनसोडण्याच्या बाबतीत स्वतः कसलेही प्रयोग करू नयेत असे सांगण्यात येते. हीच गोष्ट योगालाही लागु पडते. हे लेख वाचून व्यसनमुक्तीच्या पथावर चालणार्यांना नियमित योगाभ्यास करण्याची प्रेरणा झाली आणि त्यांनी एखादे योगकेंद्र गाठून जर सराव सुरु केला तर आमच्या लेखमालेचे सार्थक झाले असे आम्हाला वाटेल.
या लेखमालेची सुरुवात आम्ही आसन या अंगापासून करणार आहोत.
अतुल ठाकुर
—————————————
डॉ. वैशाली दाबके या भवन्स सोमाणी महाविद्यालयाच्या संस्कृत विभागात कार्यरत आहेत. त्यांनी ‘ घंटाळी मित्र मंडळ ‘ या योगसंस्थेचा योग-शिक्षण-पदविका अभ्यासक्रम विशेष श्रेणीत पूर्ण केला असून सदर संस्थेच्या विविध उपक्रमात त्यांचा सहभाग असतो.
Be the first to comment