संस्कृत भाषा संस्था व संस्कृत भारती यांच्या संयुक्त विद्यमाने बीमानगर एज्यु. सोसायटी, बोरिवली (प) येथे शनिवार २३ जून २०१८ या दिवशी संध्या.६.३०-८.०० या वेळात पुरुषसूक्त या विषयावर झालेले श्री. भालचंद्र नाईक यांचे भाषण.
बंधुभगिनींनो,
आपल्यापैकी किती जणांना ‘पुरुषसूक्त’ पाठ आहे? फारच थोड्यांना ते पाठ असेल; पण मी खात्रीपूर्वक सांगू शकतो कीं येथे जमलेल्या जवळजवळ सर्वांना पुरुषसूक्तातील एक ऋचा निश्चित माहिती आहे, आणि गणेशोत्सवात गणेशपूजनानंतर अगदी तारस्वरात ती तुम्ही म्हटलीही असेल. कोणती बरे ती ऋचा?
ॐ यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्|
ते ह नाकं महिमान: सचन्त यत्र पूर्वे साध्या: सन्ति देवा:||
अन्वय आणि अर्थ सोपा आहे.
देवा: यज्ञेन यज्ञम् अयजन्त|
देवांनी यज्ञसंकल्पाच्या द्वारे यज्ञ केला.
पुरुषसूक्ताचे सार थोडक्यात सांगायचे तर ही ‘यज्ञ’ संकल्पना. श्रीमद्भगवद्गीतेत ती स्पष्ट विशद केली आहे. त्या आधारे असे म्हणता येईल कीं “समाजाच्या कल्याणासाठी आसक्ती सोडून केलेले कर्तव्य कर्म म्हणजे यज्ञ.”
यज्ञार्थात्कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्मबंधन:|
तदर्थं कर्म कौन्तेय मुक्तसङ्ग समाचार || गी.३.९
तानि प्रथमानि धर्माणि आसन्|
ते आरंभीचे धर्म होते.
प्रजेची धारणा ज्यामुळे होते तो धर्म.
धारणात् धर्ममित्याहु: धर्मो धारयते प्रजाम्|
ते महिमान: नाकं सचन्ते यत्र पूर्वे साध्या: देवा: सन्ति|
श्रेष्ठ असे ते स्वर्गाला पोहोचले जिथे आधीपासून साध्य देव आहेत.
नाकं म्हणजे स्वर्ग.
कं म्हणजे सुख. अकं म्हणजे सुखाचा अभाव. न अकं नाकं म्हणजे सुखाचा अभाव नाही ते स्थान म्हणजे स्वर्ग.
आपले अंतिम ध्येय स्वर्गप्राप्ती असेल तर तो ज्या विराटपुरुषाच्या पूजेने मिळतो, ते सूक्त – पुरुषसूक्त आज आपण शिकू या.
सृष्टीनिर्मितीचे हे सूक्त आहे असे म्हटले जाते. निर्मितीमागे सर्वस्वत्यागरूप यज्ञ आहे.
सहयज्ञा: प्रजा: सृष्ट्वा पुरोवाच प्रजापति:|
अनेन प्रसविष्यध्वमेष वोऽस्त्विष्टकामधुक्|| गीता ३.१०
प्रजापती ब्रह्माने कल्पारंभी यज्ञासह प्रजा उत्पन्न करून सांगितले कीं तुम्ही या यज्ञाच्याद्वारे उत्कर्ष करून घ्या आणि हा यज्ञ तुमचे इच्छित मनोरथ पूर्ण करणारा होवो.
विश्वकल्याणासाठी सर्वस्वाचा त्याग (सर्वहुत:) त्या पुरुषोत्तमाने केला आहे, त्याविषयी ‘सु उक्त’ चांगले बोललेले हे पुरुषसूक्त आहे.
आपल्या षोडशोपचार पूजेत पुरुषसूक्त म्हटले जाते. उपचार १६ आणि ऋचाही १६. काही ठिकाणी एकेक उपचार करताना एकेक ऋचा म्हटली जाते तर बऱ्याच वेळा स्नान वा अभिषेक करताना संपूर्ण पुरुषसूक्त म्हटले जाते.
देवीदासकृत व्यंकटेशस्तोत्रांत –
|| करूनि पंचामृत स्नान | शुद्धामृत वरी घालून || तुज करूं मंगल स्नान | पुरुषसूक्ते करूनिया || असा उल्लेख आहे.
संत एकनाथ एकनाथी भागवतात म्हणतात –
पुरुषसूक्त मंत्रे जाण। करावे स्नान निर्मळ जळे।।
नामदेव महाराज म्हणतात-
वासुदेवा हृषिकेशा। माधवा मधुसूदना। करिताती स्तवना। पुरुषसूक्ते ।।
नामा म्हणे ऐसे। करिता स्तवन।
तोषला भगवान। क्षीराब्धीत।।
ऋग्वेदातील १० व्या मंडळातील ९० वे सूक्त पुरुषसूक्त. वेदांच्या चारीही संहितात थोड्याफार पाठभेदाने पुरुषसूक्त आढळते, इतके ते महत्त्वाचे आहे. शुक्ल यजुर्वेदाच्या वाजसनेयी आणि कण्व संहितेत २२ तर कृष्ण यजुर्वेदात १८ आणि अथर्ववेदांत १६ ऋचा आहेत. सामवेदात ७ आहेत.
आज आपण ऋग्वेदातील पुरुषसूक्त पाहू या.
अविदित्वा ऋषिं छन्द: देवतां योगमेव च । योऽध्यापयेजपेद्वापि पापीयाञ्जायते तु सः ॥
ऋषी, छंद, देवता आणि विनियोग न जाणता जो सूक्त शिकवेल वा म्हणेल तो पापाचा धनी होईल.
यास्काचार्यांनी ऋषी शब्दाची व्युत्पत्ती देताना “ऋषि: दर्शनात्” अशी दिली आहे. मंत्र ज्याला दिसले तो ऋषी. पुरुषसूक्ताचा “नारायणो नाम ऋषि:|”
छंद म्हणजे त्या ऋचेचे वृत्त. ऋग्वेदातील पुरुषसूक्ताच्या पहिल्या १५ ऋचांचा छंद अनुष्टुप् आणि १६ व्या ऋचेचा छंद त्रिष्टुप् आहे.
ऋषी जिचे वर्णन करतात ती देवता. या सूक्ताची देवता ‘पुरुष’ आहे. हा पुरुष म्हणजे पुढे उपनिषदांत विकसित झालेली ब्रह्म ही संकल्पना.
ऋक् किंवा ऋचा म्हणजे जिच्या सहाय्याने देवतांची स्तुती केली जाते अशी छंदोबद्ध रचना.
पुरुषसूक्ताचा अभ्यास करतांना पाश्चात्य अभ्यासक बहुधा सायणभाष्याचा आधार घेतात. याबरोबरच आधुनिक विद्वान यास्काचार्यांच्या निरुक्तानुसार अर्थ लावण्याचा प्रयत्न करतात. भारतीयांमध्ये दयानंद सरस्वती, अरविंद घोष आणि वेदमूर्ती पंडित श्रीपाद दामोदर सातवळेकर यांची भाष्यें प्रसिद्ध आहेत. विशेषत: सातवळेकरांनी सरलार्थ, भावार्थ, गर्भितार्थ अशी विवेचक चर्चा केली आहे. (हे पुस्तक पुणे नगर वाचन मंदिरात उपलब्ध आहे.)
पुरुषसूक्ताचा अभ्यास करून त्याचा विनियोग जीवन अर्थपूर्ण जगण्यासाठी – लोककल्याणासाठी सर्वस्वाचा त्याग करून कृतार्थ जीवन जगण्यासाठी – केला पाहिजे.
पुरुषसूक्तापूर्वी एक शातिमंत्र म्हणण्याचा प्रघात आहे.
मनाला शांती मिळावी, कार्य निर्विघ्न पार पडावे, तापत्रयापासून मुक्ती मिळावी आणि सर्वांचे कल्याण व्हावे यासाठी हा शांतिमंत्र म्हटला जातो. तो तैत्तिरीय उपनिषदातून घेतला आहे. तो आता पाहूं.
ॐ तच्छं योरावृणीमहे | गातुं यज्ञाय |गातुं यज्ञपतये |
दैवी स्वस्तिरस्तु नः | स्वस्तिर्मानुषेभ्यः |
ऊर्ध्वं जिगातु भेषजम् |
शं नो अस्तु द्विपदे | शं चतुष्पदे ||
ॐ तत् शं यो: आवृणीमहे |
शं म्हणजे शांती, कल्याण.
यो: चा अर्थ ही तसाच आहे. यु = जोडणे. परमात्म्याला जोडले गेल्यामुळे मिळणारी शांती येथे अभिप्रेत आहे. शं म्हणजे इहलोकी शांती आणि यो: म्हणजे परलोकी कल्याण व्हावे, यासाठी आम्ही प्रार्थना करतो.(गातुं यज्ञाय | गातुं यज्ञपतये |)
यज्ञाची व यज्ञपतीची स्तुती पठणे करता यावी यासाठी जे अनिर्वचनीयाला जोडणारे, कल्याणकारी आहे, त्याची आम्ही प्रार्थना करतो.
दैवी स्वस्ति: अस्तु नः |
आम्हाला दैवी कृपाप्रसाद -शांती व कल्याण – प्राप्त होवो.
स्वस्ति: मानुषेभ्यः |
सर्व मानव जातीचे कल्याण होवो.
ऊर्ध्वं जिगातु भेषजम् |
औषधी वनस्पती उत्पन्न होवोत, वर वाढोत.
शं नो अस्तु द्विपदे |
जे दोन पायाचे आहेत त्यांना सुख शांती मिळो.
शं चतुष्पदे |
जे चार पायांचे आहेत त्यांचे कल्याण होवो.
ॐ शान्ति: शान्ति: शान्ति:।।
शरीराला, मनाला व जीवात्म्याला शांती लाभो.
किंवा
त्रिविधतापापासून मुक्ती मिळो.
आधिभौतिक, आधिदैविक आणि आध्यात्मिक – नैसर्गिक आपत्ती, दैवी प्रकोप आणि आत्मिक साधनेतील अडथळे या तिन्हीवर मात करता यावी, शांती लाभावी हा अर्थ या त्रिवार शांती उच्चारामागे आहे.
आता पुरुषसूक्तातील ऋचा पाहू.
अन्वय
सहस्रशीर्षा सहस्राक्ष: सहस्रपात् पुरुष:
स: भूमिं विश्वत: वृत्वा दशाङ्गुलम् अत्यतिष्ठत्|
हजारो मस्तके, हजारो डोळे, हजारो पाय असणारा तो पुरुष भूमीला सभोवार वेढून दहा बोटे वर उरला आहे.
गीतेतही या अर्थाचा श्लोक आहे.
सर्वत: पाणिपादं तत्सर्वतोक्षिशिरोमुखम् |
सर्वत: श्रुतिमल्लोके सर्वमावृत्य तिष्ठति||१३.१३
विश्वरूपदर्शनाच्या (११वा अध्याय) वर्णनातही
अनेकवक्त्रनयनमनेकाद्भुतदर्शनम् | असा उल्लेख आहे.
महाभारतातील भीष्म युधिष्ठिर संवादात विष्णुसहस्रनाममाहात्म्य सांगताना –
नमोऽस्त्वनंताय सहस्रमूर्तये |
सहस्रपादाक्षिशिरोरुबाहवे ||
सहस्रनाम्ने *पुरुषाय शाश्वते |सहस्रकोटीयुगधारिणे नम: ||* असे वर्णन आहे.
सहस्ररूपे धारण करणाऱ्या सहस्रपाद, सहस्रनेत्र, सहस्रशिर, सहस्रबाहू असलेल्या अनंताला नमस्कार असो. सहस्रकोटी युगे धारण करणाऱ्या, सहस्रनामाने संबोधिल्या जाणाऱ्या शाश्वत पुरुषाला नमस्कार असो.
मराठीतही “स्थिरचर व्यापुनी दशांगुळे उरला.”
या सर्व वर्णनांचे मूळ पुरुषसूक्तात आहे.
हा पुरुष सर्वव्यापी, सर्वसाक्षी (सहस्राक्ष) आहे हे आपण पाहिले. तो त्रिकालातीतही आहे.
पुरुष एवेदं सर्वं यद्भूतं यच्च भव्यम् |
उतामृतत्वस्येशानो यदन्नेनातिरोहति ||२||
अन्वय
यत् भूतं यत् च भव्यम् उत यत् अन्नेन अतिरोहति इदं सर्वं अमृतत्वस्य ईशान: पुरुष: एव |
जे घडून गेले आहे, जे पुढे घडणार आहे आणखी जे अन्नाने वाढते आहे ते हे सर्व काही अमृतत्त्वाचा स्वामी असणारा पुरुषच आहे.
त्या पुरुषाचे त्रिकालातीतत्व येथे सूचित केले आहे. भूत, भविष्य आणि वर्तमानाच्या पलीकडे तो “अमृतत्त्वाचा स्वामी” आहे.
एतावानस्य महिमातो ज्यायांश्च पूरुष:|
पादोऽस्य विश्वा भूतानि त्रिपादस्यामृतं दिवि ||३||
एतावान् अस्य महिमा च अत: पूरुष: ज्यायान् |अस्य पाद: विश्वा भूतानि| अस्य त्रिपात् दिवि अमृतम् |
अशाप्रकारचा याचा मोठेपणा आहे आणि हा पुरुष याहून मोठा आहे. ह्याचा एक चतुर्थांश म्हणजे सर्व प्राणिमात्र आहेत. याचे तीन भाग द्युलोकात अविनाशी आहेत.
त्रिपादूर्ध्व उदैत्पुरुष: पादोऽस्येहाभवत्पुन:|
ततो विष्वङ्व्यक्रामत्साशनानशने अभि ||४||
अन्वय
पुरुष: त्रिपाद् ऊर्ध्व: उदैत्| अस्य पाद: इह पुन: अभवत्| तत: साशनानशने विष्वङ् अभि व्यक्रामत्| (स+अशन+अनशने)
हा पुरुष वर (द्युलोकात) तीन भाग वाढला. याचा एक भाग इथे (भूतांच्या रूपाने) पुन्हा उत्पन्न झाला. नंतर अन्नमय व अन्नविरहित (सृष्टीला) त्याने सर्व बाजूंनी व्यापले. (सजीव निर्जीव सृष्टी)
तस्माद्विराळजायत विराजो अधि पूरुष: |
स जातो अत्यरिच्यत पश्चाद्भूमिमथो पुर: ||५||
अन्वय
तस्मात् विराट् अजायत | विराज: अधि पूरुष:| अथ जात: स: भूमिं पश्चात् पुर: अति अरिच्यत|
त्यापासून विराट पुरुष उत्पन्न झाला. विराट पुरुषापासून अधिपुरुष निर्माण झाला. आणि जन्मत:च तो पृथ्वीला पुढून मागून व्यापून उरला.
(विराट पुरुष – विश्व, अधिपुरुष – जग,पृथ्वी)
यत्पुरुषेण हविषा देवा यज्ञमतन्वत |
वसन्तो अस्यासीदाज्यं ग्रीष्म इध्म: शरद्धवि:||६||
अन्वय
देवा: पुरुषेण हविषा यत् यज्ञम् अतन्वत |अस्य
वसन्त: आज्यं ग्रीष्म: इध्म: शरद् हवि:आसीत्|
देवांनी पुरुषरूपी हविर्द्रव्याने जेव्हा यज्ञाचा विस्तार केला, त्या यज्ञाचे वसंतऋतू हे तूप, ग्रीष्मऋतू समिधा (आणि) शरदऋतू हे हविर्द्रव्य होते.
वसंतऋतू नवचैतन्य देणारा म्हणून सृष्टीच्या उत्पत्तीच्या यज्ञात तूप, ग्रीष्म शुष्क असल्यामुळे समिधा शरदऋतू अन्नसमृद्धी करणारा म्हणून हविर्द्रव्य हे रूपक पटण्याजोगे आहे.
तं यज्ञं बर्हिषि प्रौक्षन्पुरुषं जातमग्रत: |
तेन देवा अयजन्त साध्या ऋषयश्च ये ||७||
अन्वय
तम् अग्रत: जातं यज्ञं पुरुषं बर्हिषि प्रौक्षन् | तेन ये साध्या: देवा: च् ऋषय: अयजन्त|
त्या आधी जन्मलेल्या यज्ञपुरुषाला दर्भावर ठेवून त्यांनी मंत्रजल शिंपडले. त्याच्या योगाने जे साध्यदेव आणि ऋषी होते त्यांनी यज्ञ केला.
(साध्यदेव – प्राचीन यज्ञकर्ते)
तस्माद्यज्ञात्सर्वहुत: सम्भृतं पृषदाज्यम् |
पशून्तांश्चक्रे वायव्यानारण्यान्ग्राम्याश्च ये ||८||
अन्वय
तस्मात् सर्वहुत: यज्ञात् पृषदाज्यं सम्भृतम्| तान् वायव्यान् आरण्यान् च ग्राम्यान् पशून् चक्रे|
त्या सर्वप्रकारच्या आहुती दिलेल्या यज्ञापासून दधिमिश्रित तूप उत्पन्न झाले. (त्यापासून) अंतरिक्षातील पक्षी आणि रानटी आणि पाळीव प्राणी निर्माण केले.
तस्माद्यज्ञात्सर्वहुत ऋच: सामानि जज्ञिरे |
छन्दांसि जज्ञिरे तस्माद्यजुस्तस्मादजायत ||९||
अन्वय
तस्मात् सर्वहुत: यज्ञात् ऋच: सामानि जज्ञिरे |
तस्मात् छन्दांसि जज्ञिरे| तस्मात् यजु: अजायत ||९||
त्या सर्वहुत यज्ञातून ऋचा, सामे उत्पन्न झाली. त्याच्यापासून छंद उत्पन्न झाले. त्याच्यापासून यजुर्मंत्र उत्पन्न झाले.
तस्मादश्वा अजायन्त ये के चोभयादत:|
गावो ह जज्ञिरे तस्मात्तस्माज्जाता अजावय:||१०||
अन्वय
तस्मात् अश्वा: च ये के उभयादत: अजायन्त |
तस्मात् गाव: जज्ञिरे| तस्मात् अजावय: जाता:|
*त्यातून (त्या यज्ञापासून) घोडे आणि जे कोणी खालीवर दात असणारे (प्राणी) निर्माण झाले.
त्या यज्ञातून गाई उत्पन्न झाल्या. त्या यज्ञातून शेळ्या मेंढ्या जन्माला आल्या.*
(उभयादत: हे वैदिक रूप आहे. सायणभाष्यानुसार “ऊर्ध्वाधोभागयो: उभयो: दन्तयुक्ता:” म्हणजे खालीवर दात असणारे)
यत्पुरुषं व्यदधु: कतिधा व्यकल्पयन् |
मुखं किमस्य कौ बाहू का ऊरू पादा उच्येते ||११||
अन्वय
यत्पुरुषं व्यदधु: कतिधा व्यकल्पयन् |
अस्य मुखं किम् | कौ बाहू | कौ ऊरू| कौ पादौ उच्येते |
जेव्हा त्यांनी (देवांनी) पुरुषाला विभागले तेव्हा त्यांनी किती प्रकारे त्याला छेदले? याचे मुख कोणते? बाहू, मांड्या, पाय कोणते म्हटले जातात? (किती भागात त्याचे हवन केले)
ब्राह्मणोऽस्य मुखमासीद्बाहू राजन्य: कृत:|
ऊरू तदस्य यद्वैश्य: पद्भ्यां शूद्रो अजायत ||१२||
अन्वय
अस्य मुखं ब्राह्मण: आसीत् |बाहू राजन्य: कृत:|
अस्य ऊरू यत् वैश्य: तत् | शूद्र: पद्भ्यां अजायत |
याचे मुख ब्राह्मण होता. त्याचे बाहू क्षत्रिय केला गेला. याच्या मांड्या जो वैश्य तो झाला. शूद्र पायापासून जन्मला.
(इथे ‘वर्ण’ किंवा ‘जाति’ या शब्दांचा उल्लेख नाही.)
हे एकाच शरीराचे भाग असल्याने उच्च नीच भाव संभवत नाही. पायाला काटा टोचला तर सर्व शरीर एक असल्यामुळे डोळ्यात पाणी येते.
आपल्या संतांनी हेच सांगितले आहे.
तुकाराम महाराज म्हणतात,
“चारी वर्ण झाले एकाचिये अंगी | अवघी एकाचीच वीण ||
तेथे कैंचे भिन्नाभिन्न | वेदपुरुष नारायण तेणे केला निवाडा ||”
तुका म्हणे देव सर्वांठायी झाला | भरुनी उरला पांडुरंग ||
डॉ.बाबासाहेब आंबेडकर १९३६ साली एका लेखात लिहितात, “शरीराचे निरनिराळे अवयव निरनिराळी कामे करू लागल्याने ते एका शरीराचा भाग नाही असे होऊ शकत नाहीत. तद्वतच, क्षत्रिय बाहूपासून, ब्राह्मण मुखापासून, वैश्य मांड्यांपासून, शूद्र पायांपासून उत्पन्न झाले असले तरी ते एका शरीराचा भाग आहेत हे दाखवणे हा पुरुषसूक्ताचा उद्देश आहे असे आम्हाला वाटते. चारी वर्ण मुळात एकच आहेत. श्रमविभागाने झालेला भेद निरर्थक आहे ही शिकवण लोकांना देऊन ऐक्याचा ठसा लोकांच्या मनावर उठवावा या हेतूने पुरुषसूक्त रचले गेले असावे असे आमचे मत आहे.”
चंद्रमा मनसो जातश्चक्षो: सूर्यो अजायत |
मुखादिन्द्रश्चाग्निश्च प्राणाद्वायुरजायत ||१३||
अन्वय
चंद्रमा: मनस: जात: | चक्षो: सूर्य: अजायत |
मुखात् इन्द्र: च अग्नि: च | प्राणात् वायु: अजायत |
चंद्र हा (पुरुषाच्या) मनापासून उत्पन्न झाला. नेत्रापासून सूर्य उत्पन्न झाला. मुखापासून इंद्र आणि अग्नी आणि प्राणापासून वायू उत्पन्न झाला.
चक्षो: – ‘चक्षुस:’ ऐवजी वैदिक रूप.
नाभ्या आसीदन्तरिक्षं शीर्ष्णो द्यौ: समवर्तत |
पद्भ्यां भूमिर्दिश: श्रोत्रात्तथा लोकाॅं अकल्पयन् ||१४||
अन्वय
नाभ्या: अन्तरिक्षम् आसीत् | शीर्ष्ण: द्यौ: समवर्तत | पद्भ्यां भूमि: श्रोत्रात् दिश: तथा लोकान् अकल्पयन् ||१४||
(पुरुषाच्या) नाभिपासून अंतरिक्ष झाले. मस्तकापासून द्युलोक झाला. पायापासून भूमी, कानांपासून दिशा याप्रमाणे लोक निर्माण झाले.
शीर्ष्ण: – ‘शिरस:’ ऐवजी वैदिक रूप.
सप्तास्यासन्परिधयस्त्रि: सप्त समिध: कृता:|
देवा यद्यज्ञं तन्वाना अबध्नन्पुरुषं पशुम् ||१५||
अन्वय
अस्य सप्त परिधय: आसन् | त्रि: सप्त समिध: कृता:| यज्ञं तन्वाना: देवा: पुरुषं पशुम् अबध्नन् |
ह्या यज्ञासाठी सात परिधी होत्या. एकवीस समिधा केल्या गेल्या. यज्ञ करणाऱ्या देवांनी पुरुषरूपी पशूला बांधले.
(त्या पुरुषाच्या बलिदानातून- त्यागातून सृष्टीनिर्मिती झाली.)
परिधय: यज्ञासाठी केलेले इंधनाचे चर. (सात व्याहृती किंवा सात छंद असे अर्थ संभवतात.)
२१ समिधा – १२ महिने, ५ऋतू, ३ लोक, १सूर्य
(५ऋतू – हिवाळा, उन्हाळा, पावसाळा, वसंत आणि शरद असा अर्थ सांगितला जातो.)
यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन् |
ते ह नाकं महिमान: सचन्त यत्र पूर्वे साध्या: सन्ति देवा: ||१६||
(या ऋचेचा अन्वय भाग १ मध्ये दिला आहे.)
देवांनी यज्ञसंकल्पाच्या द्वारा यज्ञ केला. ते आरंभीचे धर्म होते. श्रेष्ठ असे ते स्वर्गाला पोहोचले, जिथे आधीपासून साध्य देव आहेत.
साध्या: देवा: – साधनात् | तेषामेषा भवति |
साध् = साध्य करणे ह्यापासून साध्य. जे कोणालाही साधता येत नाही ते हे साध्य साधतात. हे साध्य म्हणजे प्राण. ह्या प्राणरूप ऋषींनी हजार वर्षांचे यज्ञसत्र करून ही सृष्टी निर्माण केली.
देवतापर साध्य म्हणजे सूर्य किरण असा अर्थ दुर्गवृत्तीत दिला आहे.
ऋणनिर्देश
संदर्भ – १) ऋग्वेदसूक्तानि – शिल्पा सुमंत (डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे)
२) पुरुषसूक्तम् – स्वामी चिन्मयानंदांच्या पुस्तकाचा मराठी अनुवाद. (श्री वि गो बावधाने) चिन्मय प्रकाशन, पुणे २
३) Internet – Dr. Shankar B Chandekar (आणि अन्य अनेक…)
४) डॉ गौरी माहुलीकर आणि श्री ल अभ्यंकर यांचे मार्गदर्शन
ज्यांनी ज्यांनी व्याख्यानाच्या यशस्वितेसाठी मदत केली त्या सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद.
ज्या पुरुषाच्या कृपाप्रसादाने हे घडले, त्याला कृतज्ञतापूर्वक नमस्कार.
Bhalchandra Awadhoot Naik
M.E.(Civil), D.B.M.
Retd.Sr.Lecturer, Structural Engineering Department, V.J.T.I. Mumbai.
National Merit Scholar (1965-1971)
Recipient of State Award for Teachers (1995)
नमो नमः। अगदी सम्यक्तः उलगडून दाखवलात अर्थ. नीट कळला. धन्यवाद.
सम्यक् श्रव्य मिळेल का?
— राजेन्द्र दातार,बदलापूर.
धन्यवाद.
ध्वनिमुद्रण केलेले नाही.