उज्ज्वलाताईंच्या संस्कृत वर्गात शिकणार्या बहुतेकांच्या कानावरून हे नाव गेले असेल. संस्कृत शिकवताना उज्ज्वलाताईंना काही गोष्टी सांगण्याची सवय आहे. अनेकदा क्लिष्ट गोष्टी समजवून सांगताना या छोट्या छोट्या गोष्टींनी वर्गातील वातावरण खेळकर राहते असा माझा अनुभव आहे. अशा गोष्टींमध्ये अनेकदा पराडकरसरांचा विषय निघत असे. आणि उज्ज्वलाताई भान हरपून बोलत राहात. उज्ज्वलाताईंना सरांच्या प्रत्यक्ष भेटीचे भाग्य लाभले आहे. त्यांच्यासोबत त्यांनी काम केले आहे. आणि त्यांच्याकडून अनेक गोष्टींबाबत त्यांना मार्गदर्शन मिळाले आहे. पराडकरसरांसारख्या प्रकांड पण्डिताबद्दल उज्ज्वलाताईंकडे असलेल्या अनेक गोष्टी या लेखी स्वरुपात उपलब्ध व्हाव्यात असं वाटलं. यात सरांबद्दल जाणून घ्यावे, त्यांचे विचार, त्यांचे तत्त्वज्ञान समजून घेता यावे हा माझा स्वार्थ होताच. त्यामुळे उज्ज्वलाताईंना या गोष्टी सांगण्याची मी विनंती केली. ती त्यांनी तत्काळ आणि आनंदाने मान्य केली. त्याबद्दल उज्ज्वलाताईंचे सुरुवातीलाच मी आभार मानतो.
ताईंनी एकदा एखादी गोष्ट करण्याचे मनावर घेतले की अत्यंत अभ्यासू वृत्तीने त्या सुरुवात करतात आणि ते काम त्या निर्दोष पार पाडतात याचा मला त्यांच्या वर्गामुळे खुप चांगला अनुभव आहे. त्यांनी होकार दिला आणि लगेचच टिपणे काढून मला पाठविण्यास सुरुवात केली. त्या कामाशी संबंधित इतरांनीही हे गांभीर्य आणि समर्पित वृत्ती दाखवली पाहिजे अशी त्यांची रास्त अपेक्षा असते. त्या अपेक्षेला मी कितपत उतरु शकेन मला माहित नाही. पण हे लेख वाचकांना आवडले तर त्याचे सारे श्रेय उज्ज्वलाताईंना आहे कारण ते संपूर्णपणे त्यांनी पाठवलेल्या टिपणांवर आधारित आहेत. या लेखनात काही दोष आढळले तर ते सर्वस्वी माझे आहेत. कारण, लिहायचं आहे ते पराडकरसरांबद्दल आणि सांगणार आहेत उज्ज्वलाताई. अशा परिस्थितीत माझ्या मर्यादांची मला नम्र जाणीव आहे. ही जाणीव वाचकांनीही ठेवून या दोषांसाठी मोकळ्या मनाने मला क्षमा करावी ही विनंती. सुरुवातीलाच आमचे कुलदैवत वज्रेश्वरीची प्रार्थना करतो, पराडकरसरांच्या आणि उज्ज्वलाताईंच्या पायावर डोके ठेवून त्यांचा आशीर्वाद मागतो, आणि लेखनाला सुरुवात करतो.
पराडकरसर आणि उज्ज्वलाताईंची भेट साधारणपणे १९९२-९३ च्या सुमारास झाली. डॉ. शिवराम दत्तात्रेय आठवले आणि पराडकरसर या दोघांनी मिळून गरजू विद्यार्थ्यांचे शिक्षण पैशा अभावी अडू नये म्हणून “सरस्वती देवी विद्या विकास ट्र्स्ट” ची स्थापना केली. या कार्याचे उज्ज्वलाताईंना फार आकर्षण होते. त्यांनी आपल्या नेहेमीच्या स्वभावाप्रमाणे ट्रस्टच्या कामात स्वतःला मनापासून झोकून दिले. उज्ज्वलाताईंकडून या कामासाठी अशी भरीव साथ मिळाल्याने या दोघांची त्यांच्यावर मर्जी बसली आणि त्यांनी ताईंची ट्र्स्टच्या सचीव म्हणून नेमणूक केली. या दोघांचा उल्लेख उज्ज्वलाताई अत्यंत कृतज्ञतेने करतात. त्या म्हणतात या दोघांकडून खूप काही शिकायला मिळाले. समाजसेवा कशी करावी, ती करताना समर्थ रामदासांचे “अखंड सावधपण” कसे बाळगावे, सतर्कता, प्रामाणिकपणा, आचारविचारातली एकरूपता कशी असावी, कोणतेही काम बारकाईने आणि चोखपणे कसे करावे अशा असंख्य गोष्टी त्यांच्याकडून उज्ज्वलाताईंना शिकायला मिळाल्या. कोणत्याही समाजसेवी संस्थेचे कार्य हे लोकांनी दिलेल्या देणग्यांवर चालत असते. या देणग्या मिळविण्यासाठी नवनवीन योजना हे दोघेही आखत असत. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आधी स्वतःच देणगी देऊन ते या योजनेचा श्रीगणेशा करीत आणि त्यानंतर लोकांकडे जात. बोले तैसा चाले हे तत्त्व असल्याने यांची पाऊले लोकांनी वंदिली.
पराडकर सरांचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांची विद्वत्ता आणि प्रकांड पांडित्यामुळे अनेक संस्कृत आणि हिन्दी संस्थाकडून त्यांचा सत्कार होत असे आणि त्यात त्यांना गौरव निधी दिला जात असे. हा सारा निधी ते या आपल्या संस्थेला देत असत. आणि सत्काराबद्दल कधीही वाच्यता करीत नसत. त्यांचा सत्कार झाला हे त्यांनी संस्थेत जमा केलेल्या गौरवनिधीमुळेच कळायचे. एका सत्कार समारंभात तर सरांची हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आली. सरांना शाल, मानपत्र आणि पंचवीस हजार रुपये देण्यात आले. ही सारी रक्कम सरांनी “सरस्वती विद्या विकास ट्रस्ट” ला देऊन टाकली. उज्ज्वलाताई पुढे सांगतात “एका ठिकाणी सत्कार झाला त्याचे हे पैसे” सर पैसे देताना इतकेच म्हणाले. त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढली होती हे इतरांकडून कळले. सर अतिशय प्रसिद्धी पराङ्मुख, नम्र आणि मृदुभाषी होते. पण समाजातील कमी होत चाललेली नीतिमत्ता, समाजातील अन्याय आणि दांभिकपणा यावर बोलताना मात्र ते उपहासात्मक बोलत. त्याहीवेळी त्या बोलण्याला नर्म विनोदाची झालर असे. सरांचे भाषांवरील प्रभुत्व हा जणू चमत्कारच होता. सर मराठी, हिन्दी, संस्कृत आणि इंग्रजी भाषेत अस्खलितपणे बोलत. आणि महत्त्वाचे म्हणजे एका भाषेत बोलताना ते दुसर्या भाषेतील शब्दाचा कधीही वापर करीत नसत. इतकी त्या भाषांवर सरांची हुकुमत होती. ते भाषाप्रभू होते. आणि शब्दप्रभूही होते.
प्रत्येक शब्दाच्या व्युत्पत्तीचे त्यांना सखोल ज्ञान होते. ते शब्दाची फोड करून त्याबद्दल बोलु शकत. शिकवताना ते विषयाबाबत आपल्या भावना, विचार, आपली मांडणी यासाठी अत्यंत चपखल शब्दांची योजना करीत. त्यामुळे त्यांचे शिकवणे अतिशय प्रभावी होऊन ते विद्यार्थ्यांपर्यंत अतिशय परिणामकाररित्या पोहोचत असे. त्यामुळे ते अत्यंत विद्यार्थीप्रिय शिक्षक तर होतेच आणि शिक्षक म्हणून समाजातही अत्यंत लोकप्रिय होते. ते कुठेही बाहेर दिसले की लोकांचा त्यांच्याभोवती गराडा पडत असे. त्यांच्या सूक्ष्म चिकित्सक बुद्धीमत्तेचा आणि मार्मिकतेचा दाखला देताना उज्ज्वलाताईंनी एक फार सुरेख उदाहरण दिले. एकदा त्या आठवीच्या मुलांचे संस्कृतचे पेपर तपासत असताना सर आले. त्यांनी सहज एक पेपर उचलून पाहिला. त्यात विद्यार्थ्याने वाक्य तयार केले होते “शङ्करः कुप्यति”. सर म्हणाले “व्याकरण दृष्ट्या हे वाक्य बरोबर आहे. पण शंङ्कर शब्दाची व्युत्पत्ती आहे “शं करोति इति शंङ्करः म्हणजेच कल्याण करतो तो शंकर. कल्याण करणारा माणूस रागवेल कसा? त्यापेक्षा रूद्रः कुप्यति असे वाक्य असले पाहिजे.” त्यानंतर सर अनेक शब्दांच्या व्युत्पत्तींबद्दल सांगत होते. अर्थातच ही चर्चा आठवीच्या विद्यार्थ्याच्या वाक्यातील दोष काढण्यासाठी नसून संस्कृत वाक्यरचना करताना किती सूक्ष्म विचार करता येतो, किंबहूना तो केला जावा यासाठी उज्ज्वलाताईंचे शिक्षण व्हावे म्हणून होती हे सूज्ञांस सांगणे न लगे.
(क्रमशः)
अतुल ठाकुर
Be the first to comment