“थांबा, थांबा. तुम्ही नका जाऊ वर्गात. फक्त विद्यार्थी जातील.” बांद्र्याच्या नॅशनल कॉलेजमध्ये लेखी परीक्षेसाठी नंबर आला होता. परीक्षा होती संस्कृत एम्. ए.ची. बेल् वाजली. परीक्षेसाठी आम्ही दोघे, मी व माझे पति श्री. विवेक भट वर्गात जायला लागलो असता शिपायाने आम्हाला अडवले. त्याची काय चूक म्हणा तो आम्हाला पालक समजला. 1999 साल. आमचे वय होते एक्कावन्न वर्षे. मग कार्ड वगैरे दाखवून शेवटी आत गेलो. प्रौढ विद्यार्थी होतो ना आम्ही!
वयाच्या पन्नाशीत संस्कृत शिकायला सुरुवात करीत होतो. मी मुम्बईतील एम्.बी.बी.एस.डॉक्टर आणि माझे पति यु.डी.सि.टी. या संस्थेतील केमिकल एंजीनियर. 1964 साली विलेपार्ले येथील नामांकित पारले टिळक विद्यालयातून एस्.एस्.सी. झालो होतो. संस्कृत हा अत्यंत आवडता विषय होता. त्यामुळे आपापल्या क्षेत्रात चांगले काम करीत असतानाच अधून मधून संस्कृतचं वाचनही करण्याचा प्रयत्न करीत होतो. 1996 मध्ये आम्हाला कालिना येथील संस्कृत विभागाची माहिती मिळाली, तो सुमुहुर्तच असावा!
शोधत शोधत संस्कृत विभागात आलो. माननीय डॉ. सिंधु डांगे त्यावेळी विभागप्रमुख होत्या. त्यांना भेटलो. आमच्याकडे पाहून त्यांनी काही प्रश्न विचारले. “त्वान्त, ल्यबन्त, सति सप्तमी म्हणजे काय?” वगैरे. आम्ही त्याची योग्य उत्तरे दिली असावीत. बाईंच्या चेहेर्यावर समाधान दिसले. “तुम्ही सर्टिफिकेटपासून सुरूवात करू नका, थेट डिप्लोमाला या” बाईंनी सुचवले. आम्हाला बरं याचं वाटलं की बत्तीस वर्षानंतरही आम्ही शाळेत शिकलेले काहीही विसरलो नव्हतो. मनापासून आवड असली ना की आपण काहीही विसरत नाही हे खरं! तेव्हा वय आड येत नाही.
दुसरी एक गोष्ट म्हणजे योग असला की सगळ्या गोष्टी जुळून येतात. आमचे आपापले व्यवसाय चालू होते. मी मालाड येथील रुग्णालयात काम करीत होते. सांताक्रुज कालिनातील वर्ग कसे काय भरता येतील हा प्रश्न मनात होता. पण नशीबाने वर्ग दर शनिवारी अडीच ते साडे पाच असत. आम्ही प्रयत्न पूर्वक ते जमवले. सगळे प्रौढ विद्यार्थीच होते. शिकताना खूप मजा आली. प्रथम माहुलीकर मॅडम वर्गावर आल्या. त्या नेमक्या आमच्या शाळेतल्याच निघाल्या. शाळेत संस्कृत शिकवणारे आमचे शिक्षकही एकच होते. नंतर नरसाळे मॅडम, बाक्रे मॅडम यांनीही निरनिराळ्या विषयांचे वर्ग घेतले. सर्व शिक्षक विषयाची आवड असलेले व मनापासून शिकवणारे होते. हे आमचे भाग्य. त्यांच्यामुळे गोडी वाढतच गेली. विद्यापीठातला रम्य परिसर, पावसाळ्यात तर अधिकच रम्य. कधी एकदा शनिवार येतो याची आम्ही वाट पहात असू.
बघता बघता वर्ष संपले. आता? माहुलीकर मॅडम म्हणाल्या, “आता एम्.ए. करा.” पण कसं? आठवड्यातील तीन दिवस दुपारी लेक्चर्स असत. मला रुग्णालयात दिवस/रात्र ड्युटी करावी लागे. त्यावेळी नेमकी पदोन्नतीची संधि आली. ती जर स्वीकारली तर मला फक्त दिवसपाळी करावी लागली असती. या पदासाठी सर्वांची धडपड असे. पण लेक्चर्स साठी दुपारची वेळ मोकळी मिळावी. म्हणून मी पदोन्नतीच नाकारली. सगळ्यांनी वेड्यात काढलं. वेडच लागलं होतं ना आम्हाला! अठरा वीस तासांची रात्र पाळी करून तांबारलेल्या डोळ्यांनी मालाडहून विद्यानगरीला यावं लागे. पण आत्ता नाही तर कधीच जमणार नाही. म्हणून निर्धार केला.
एन्ट्रन्स टेस्ट दिली आणि एम्.ए. ला प्रवेश घेतला. शाकुंतल आणि मेघदूत शिकायची तीव्र इच्छा होती. नेमकी तीही पूर्ण झाली. पहिल्या वर्षी शाकुंतल तर दुसर्या वर्षी मेघदूत. आणि शिकवणार्या माहुलीकर मॅडम! अहो भाग्यम्! स्पेशल विषय निवडला ‘वेदांत’. या विषयाची जराही ओळख नव्हती. परंतु हा विषय शिकण्यासाठी ही संधि होती. ती पुन्हा मिळणार नाही. सुरुवात तर केली! व्याकरण हा दुसरा विषय. पाणिनी काहीच समजेना. शाळेत शिकवणारे एक शिक्षक म्हणाले मी शिकवीन. शाळेतलं व्याकरण माहीत होतं हो. त्यांना म्हटलं, “आम्हाला वेगळंच काही आहे. त्याला पाणिनीचं व्याकरण म्हणतात.” आता आठवलं की हसूं येतं. एवढी पाटी कोरी होती. मग अनेक विषयात गति असलेल्या, अतिशय विद्वान, अनुभवी अशा डॉ. कमल वेलणकर आमच्या मदतीला आल्या. “आपण बरोबर वाचूया”. मी शिकवीन, असं नाही म्हणाल्या. केवढा हा विनय! मग आम्ही दादरला त्यांच्या घरी जाऊ लागलो. तीन चारदा भेटलो असू .पण आमची गाडी सुरु झाली. दुसर्या वर्षी डॉ. उमा वैद्य निरुक्त शिकवायला आल्या. त्या विल्सन कॉलेजमधून येथे येत होत्या. तेही आमचं सुदैवच होतं. निरुक्तासारखा विषय त्यांनी अत्यंत सोपा करून शिकवला. श्री भटांच्या मनात भाषाशास्त्राचं बीज तेव्हा पेरलं गेलं असावं. वर्गात पाहिलं तर सगळे तरुण विद्यार्थी बी.ए.संस्कृत करून आले होते. त्यांचा पाया तयार होता. आम्हीच कच्चे लिम्बु. पण शिक्षक मदत करत असत. न कंटाळता प्रश्नांची उत्तरे देत असत. पुस्तकांची नावं सांगून तीं मिळण्याचीही सोय करत असत. आम्ही दिवस रात्र अभ्यास करत इतर विद्यार्थ्यांच्या बरोबर येण्याचा प्रयत्न करीत असू. एम्.ए. चं पहिलं वर्ष पार पडलं. पण आता परीक्षेसाठी रजा मिळेना! काय करावं बरं… त्यावेळी डॉ. बाक्रे मॅडम विभागप्रमुख होत्या. त्यांनी आम्हाला सल्ला दिला की दुसरं वर्ष पुरं करा. नंतर दोन्ही परीक्षा एकदम द्या. तसंच करायचं ठरवलं. दुसरं वर्ष पूर्ण झाल्यावर पहिली परीक्षा दिली. आता दुसरी परीक्षा द्यायची. दरम्यान मुलाचं लग्न झालं होतं. घरात नवीन बाळ आलं होतं. परीक्षा राहिली. आता कसं होणार? बाळाबरोबरचे ते तर अत्यानंदाचे क्षण होते. परत हे दिवस येणार नव्हते. आणि आमची ही प्रापंचिक जबाबदारी होती. ती पार पाडली. नंतर मुले बाळासह कॅनडाला गेली. काही दिवस घर सुनं सुनं वाटलं. पण मग परत अभ्यासाला लागलो. व्यवसाय चालूच होते. तिसरं वर्ष संपत आलं असताना नव्या बाळाची चाहूल लागली. आम्हाला कॅनडाला जावं लागलं. आनंद तर होताच. मग चौथ्या वर्षी दुसरी परीक्षा द्यायचा योग अखेरीस आला. हातून जातंय की काय असं वाटत होतं. पण एकदाचं झालं. दोघांनाही प्रथम वर्ग मिळाला होता. खूप आनंद झाला. आयुष्यात कधी संस्कृत शिकत एम्. ए.ची पायरी गाठू असं स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हत. मग आकांक्षा वाढू लागल्या. पीएच्. डी. करूया का? हे जरा फारंच झालं हं! 2002 साली माझी मोठ्या रुग्णालयात सांताक्रुझला बदली झाली होती. कामाचा रगाडा खूप होता. कामाच्या निरनिराळ्या पाळ्या चालूच होत्या. पण होतं ते बर्यासाठी. धारिष्ट्यास दैव धार्जिणे. कालिनाला जाणे सोपं झालं. आता एक गोष्ट मात्र होती. लेक्चर्स नव्हती. हिम्मत करायची का? विचार मनात आला. मग विषय निवडण्यासाठी वाचन सुरु केलं. चार वाजता रुग्णालयातून सुटका झाली की सरळ कालिनाला ग्रंथालयात जाऊन बसायचं. ज्यात मी मनापासून रमू शकेन असाच विषय घ्यायचं ठरवलं. वेदांताची ओळख झाली होती. म्हटलं आता भरतमुनीचं नाट्यशास्त्र बघूया. तेवढ्यात एक अत्यंत उत्तम घटना घडली. माहुलीकर मॅडमना गाइडशिप मिळाली. त्या कालिनालाच होत्या त्यामुळे माझी भेट होणं सोपं झालं होतं. त्यांच्याशी ओळखही चांगली झाली होती. त्यांनाच गाइड म्हणून निवडणं आनंदाचं होतं. मी तेच केलं. आणि बाईंनी तो आनंद शेवट पर्यंत टिकवला, वृद्धिंगत केला. आमचं छान जमलं होतं. त्या माझ्यापेक्षा वयाने लहान होत्या. मी त्यांना मॅडम म्हणायचे तर त्या मला ताई म्हणायच्या. असं आमचं नातं होतं. अजूनही आहे. गुरुशिष्यांचे चांगले संबंध असणं हेही भाग्य मला मिळालं. त्यांनी symbolism हा विषय सुचवला होता. त्या विषयाची व्याप्ति मोठी असल्याने मी ‘Bharatamuni’s Naatyashatsra in the light of symbolism’ हा विषय निवडला.
श्री. भट यांनी भाषाशास्त्र विषयात एम्.ए. आणि पी.एच्.डी. करायचं ठरवून वेगळा रस्ता निवडला. माझ्या पुढील अभ्यासाला आता निश्चित दिशा मिळाली होती. 2003 साली पी.एच्. डी. साठी रजिस्ट्रेशन झालं. नवीन अनोळखी विषय. कितीही वाचलं तरी कमीच. पण खरोखर जीवतोड मेहेनत करीत होते. जिथे संधि मिळेल तिथे जायचं, व्याख्यानं ऐकायची. सगळी ग्रंथालयं पालथी घातली. सगळे सेमिनार्स, वर्कशॉप जे काही जिथे जिथे असेल तिथे तिथे जात होते. बडोदा, नागपूर, संगमनेर, पारडी, भोपाळ इत्यादि. विषयानुरूप पेपर सादर करीत होते. नामवंतांचे नाट्यप्रयोगही पहात होते. कलावंतांशी चर्चा करीत होते. श्री के. एन्. पणिक्कर, श्री जयदेव हट्टंगडी, संजना कपूर सर्वांच्या भेटी घेतल्या. ही सर्व मंडळी आमच्याशी फार आदरपूर्वक आणि प्रेमाने वागत. प्रयोगाच्या वेळी पहिल्या रांगेत बसायला सांगत. अशी जेव्हा संधि मिळे तेव्हा घरातला एखादा समारंभसुद्धा आम्ही टाळत असू. कारण अभ्यासाला प्राधान्य होतं. डॉ. विजय आजगावकर सरही आशीर्वादाचा हात डोक्यावर ठेवून होते. सरते शेवटी अगदी बॅग भरून फोटोकॉपीज जमल्या होत्या.
कधी अशीही वेळ आली की छे! काही उलगडत नाही. कुठून सुरुवात करावी? डोकं काम देईनासं झालंय. आपण फार मोठ्या समुद्रात उडी घेतली आहे आणि पोहता येत नाही. मॅडमसमोर जाऊन बसले. त्या म्हणाल्या, “अहो, अशी वेळ सगळ्यांवर येते. काळजी करू नका. शांतपणे मुद्दे लिहून काढा चॅप्टरप्रमाणे आणि लिहायला घ्या.” आले एकदाची त्यातून बाहेर. मग प्रबंध लिहायला घेतला.
31 ऑक्टोबर 2006. माझा सेवानिवृत्तीचा दिवस. हॉस्पिटलमध्ये सहकार्यांनी निरोप समारंभ आयोजित केला होता. उद्यापासून पेशंट तपासायचे नाहीत. घरात बसून निवांत प्रबंध पुरा करायचा हा विचार डोक्यात. दुसर्या दिवसांपासून अखंड काम सुरू. एवढी 27 वर्षे वैद्यकीय क्षेत्रात मन लावून काम केलं. त्याबद्दल मला महापौर पारितोषिकही मिळालं होतं. पण हे पर्व संपुष्टात येत असताना मनात दु:खाचा लवलेश नव्हता. एवढा विरक्तपणा! निवृत्तीनंतर किंकर्तव्यमूढ झालेल्या इतरांची अवस्था मी पाहिली होती. पण मी भाग्यवान होते. उपजीविकेचे साधन आवडता वैद्यकीय व्यवसाय होता पण जीविकेचे साधन म्हणजे संस्कृत होतं. माझ्या आवडीच्या दुसर्या विषयात मी यापुढे काम करणार होते. निवृत्ति कुठे होती! फारच थोड्यांच्या नशिबी हे भाग्य येत असावं. मी त्या नियंत्यापुढे नतमस्तक आहे.
नंतर कामाला जोर आला. सगळ्या तांत्रिक बाबी पूर्ण करून 30 ऑगस्ट 2008 या दिवशी शेवटची परीक्षा, तोंडी (viva), पार पडली. परीक्षकांनी खूप कौतुक केलं. “पुढे अभ्यास चालू ठेवा.” म्हणाल्या. माझ्या गाईड माहुलीकरही खूप आनंदित झाल्या. नेमका त्याच दिवशी त्यांचा वाढदिवस होता. “आज मला ही तुम्ही खूप छान भेट दिलीत.” म्हणाल्या. माझ्या आनंदाला पारावार नव्हता. झालं एकदाचं पी.एच्.डी. कधी स्वप्नात सुद्धा मी कल्पना केली नव्हती की संस्कृत शिकेन आणि इथपर्यंत पोचेन. यात दैवयोग खूप होते. प्रथम माझ्या पतींनी मला एम्.ए. करत असताना साथ दिली. मुलं कॅनडाला गेल्यानंतर घरी जबाबदारी उरली नाही. चांगलं आरोग्य लाभलं. सेवनिवृत्तीपूर्वी नेमकी सांताक्रुजला बदली झाली. या सर्व गोष्टींचा आता विचार केला की देवाची कृपा जाणवते. खरंच! कोणत्याही कामाला सुरुवात करायला वय कधी आड येत नाही. Age is no bar, it is just a number.
शिकण्याचा उत्तम मार्ग म्हणजे शिकवणं. तेही भाग्य मला मिळालं. प्रबंधासाठी अभ्यास करत असतानाच विद्यापीठात सर्व वर्गांना शिकविण्याची संधी मिळाली. विषयही मला अनुकूल असे मिळाले. शनिवारीच दुपारी जावं लागे. त्यातही समरसून शिकवताना खूप आनंद मिळाला. विद्यार्थ्यांचं प्रेम मिळालं. रस्त्यात कुठेही विद्यार्थी भेटले की वाकून नमस्कार करीत, घरच्यांना आवर्जून सांगत, “या आमच्या भट मॅडम”. रुग्णालयात असाच अनुभव रुग्णांच्या बाबतीत येत होता. त्यांत आता विद्यार्थ्यांची भर पडली. जवळ जवळ दहा वर्षे अध्यापनासाठी मिळाली. दोन वर्षे परीक्षक म्हणूनही काम करण्याचा अनुभव घेतला. त्याबद्दल संस्कृत विभागाप्रति मी कृतज्ञ आहे.
अशा प्रकारे आनंदाच्या डोहात पोहण्याचा अनुभव घेत गेली वीस पंचवीस वर्षं आम्ही कालक्रमणा करीत आहोत. अप्रिय अनुभवही आले परंतु ते नगण्य होते. आता वय बहात्तर झालं. अजूनही अध्ययन आणि अध्यापन चालूच आहे. ईश्वरेच्छा आणि सर्वांच्या शुभेच्छा नेहमी पाठीशी राहोत ही प्रार्थना.
Be the first to comment