संवादकीय… – सौ. श्रावणी मंदार माईणकर

वृत्तवल्लरीच्या सर्व वाचकांना दीपावलीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!!

वाचकहो, आपण तर जाणताच की या वर्षीची दिवाळी सर्वार्थाने वेगळी आहे. भूकंप, महापूर, वादळं, त्सुनामी, ढगफुटी, दहशतवादी हल्ले यांसारख्या अनेक संकटांचा अनुभव घेणार्या आणि त्यावर मात करणार्या आपल्या पिढीला आयुष्यात प्रथमच कोरोनासारख्या महामारीचा एक भयावह अनुभव मिळाला. कोणी आजवर कल्पनासुद्धा केली नव्हती अशी एक विचित्र परिस्थिती महामारीच्या रूपाने निर्माण झाली. या संकटाचा सामना कसा करावा याचा अनुभवच कोणाला नव्हता. सगळं काही चुकतमाकत ,धडपडत, झालेल्या चुकांमधून शिकत-सावरत चालू होते. मानवाच्या बुद्धिमत्तेला निसर्गाने दिलेले आह्वानच होते म्हणा ना! पण तरीही मानवजात हार न मानता या संकटाशी दोन हात करत राहिली. आज जवळजवळ नऊ महिन्यांनंतर थोडे थोडे यश दिसू लागले आहे. आपले सरकार, डॉक्टर्स, नर्सेस, पोलीस, सफाई कामगार यांच्या अविरत कष्टांचे परिणाम दिसू लागले आहेत. संकटांचे ढग पूर्णपणे निघून गेले नसले तरी आशेचे किरण दिसू लागले आहेत. मनावरील निराशेचे मळभ थोडे थोडे दूर होत आहे. आणि त्यातच आपल्या सर्वांचा आवडता दिवाळीचा सण आला आहे. खरं तर, ही दिवाळी उत्साहाने साजरी करावी अशा मन:स्थितीत कोणीच नाही. कारण प्रत्येकाच्याच आजूबाजूला असणार्या अनेक कुटुंबांची या कोरोनाने कुठल्या ना कुठल्या प्रकारे हानी केलीच आहे. पण तरीही ते सर्व काही काळासाठी का होईना बाजूला सारून आपण दिवाळीचं स्वागत करायला उभे आहोत.

वृत्तवल्लरीची ही पहिली दिवाळी नसली तरी मी ही जबाबदारी स्वीकारल्यानंतरची  वृत्तवल्लरीबरोबरची माझी ही पहिलीच दिवाळी. तेव्हा वृत्तवल्लरीच्या वाचकांसाठी काहीतरी नवीन वाचनीय घेऊन यावे असा एक विचार सहज मनात आला. आणि वृत्तवल्लरी दिवाळी फराळ ही कल्पना जन्माला आली. मग असा एक विचार झाला की संस्कृतमधील अनेक शिक्षक वर्षभर काही ना काही निमित्ताने लेखन करीत असतात पण बर्याचदा हे लेखन संस्कृतशी संबंधित अतिशय अभ्यासपूर्ण असेच असते. हे शिक्षक अनेक वर्षे या क्षेत्रात कार्यरत असल्याने त्यांची अनुभवांची शिदोरी खूप मोठी असणार. याशिवाय माझ्यासारखे या क्षेत्रात नवोदित असणारे अनेक जण आहेत. पण कमी-जास्त का होईना प्रत्येकाकडे वेगवेगळे अनुभव आहेत….मग या दिवाळीच्या निमित्ताने त्यांच्याकडून हे मनोगत जाणून घेतलं तर! आपण एकमेकांबरोबर काम करीत असतो पण मनातलं काही सांगावं अशी “फुरसत”मात्र फारशी मिळत नाही आणि म्हणूनच हे फराळाचं निमित्त… एकमेकांच्या मनातलं काही  जाणून  घेण्यासाठी केलेलं…बरेचजण एका वेगळ्याच क्षेत्रातून इथे आले आहेत त्यांचा प्रवास प्रेरणादायी आहे, कोणी या क्षेत्रात काम करत नाही पण संस्कृतवर प्रेम आहे आणि आपलं काहीतरी चुकतंय याची जाणीव होते आहे, कोणाची संस्कृतकडे बघण्याची वृत्तीच संशोधकाची आहे, तर कोणाच्या मनात आपल्या गुरुविषयी , विद्यार्थ्यांविषयी अतिशय अभिमान आणि माया आहे, तर कोणाला खूप वर्षांच्या अनुभवातून सध्याच्या संस्कृत शिक्षणात काय चुकतंय हे पोटतिडकीने सांगायचे आहे.

हे सारे तुम्हाला इथेच वाचायला मिळणार आहे. तुम्हाला ते नक्कीच आवडेल…आणि हो फक्त तुम्हीच वाचू नका तर या जगाच्या कुठल्याही कानाकोपर्यात असणार्या प्रत्येक संस्कृतप्रेमीपर्यंत हे लिखाण पोहोचवण्याचा जरुर प्रयत्न करा. बस..एक forward और एक क्लीक की तो बात है। www.vruttavallari.com ही लिंक forward करायची आणि click करायचे..की झालं..

आणि हो… ज्यांनी फक्त माझ्या एका फोन कॉलवर माझ्यासाठी दिवाळीच्या व्यग्र दिवसांत वेळात वेळ काढून लेख पाठवले त्या माझ्या गुरूंचे, सहकार्यांचे, सुह्रदांचे अत्यंत मनापासून आभार मानल्याशिवाय हे संवादकीय पूर्ण होऊच शकत नाही. म्हणून त्या सर्वाचे अतिशय मनापासून आभार!!!

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*