संस्कृत विषय शिकताना आणि शिकवताना ! – मेधा सोमण

वृत्तवल्लरी- दिवाळी फराळ यासाठी संस्कृत विषयावरील लेख लिहीताना मला खूप आनंद आणि समाधान वाटत आहे. आनंद अशासाठी की संस्कृत भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी ही संकल्पना खूप उपयुक्त होईल आणि समाधान अशासाठी की गेली ४० ते ५० वर्षे संस्कृत शिकवताना आणि शिकताना मला आलेले अनुभव मी अनेकांपर्यंत पोहोचवू शकत आहे.
                  एक गोष्ट मलाच काय , शिकवणार्या सर्वानाच जाणवली असेल की शिकवण्याची प्रक्रिया चालू असताना शिकण्याची प्रक्रिया जास्त प्रभावी असते. तसेच त्याचा आनंद शब्दातीत असतो. आठवी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मी संस्कृत शिकवत होते. शिकवत असताना माझा उद्देश विद्यार्थ्यांना संस्कृत विषयाची आवड निर्माण करणे हाच होता आणि तो पुष्कळ अंशी सफलही झाला. अनेक विद्यार्थ्यांना स्कोअरिंगसाठी या विषयाचा खूप उपयोगही झाला. संस्कृत विषयात पुढे काहीतरी करावे असा मानसही अनेक विद्यार्थ्यांनी व्यक्त केला.
                 आज वर्तमानात शब्द, धातु पाठांतराची फारशी गरज लागत नाही. परंतू मूळ संस्कृत भाषा शिकण्यासाठी तीन ते चार वर्षे संस्कृत व्याकरण नीट समजून घेऊन आवश्यक तेथे पाठ करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. एकदा का व्याकरणाचा पाया मजबूत झाला तर पुढच्या काळात कोणताही ग्रंथ वा कलाकृती अभ्यासणे सुलभ होते.
                 जसं कोणतेही वाद्य वाजवितांना , गाणं शिकताना, कथ्थक- भरतनाट्यम् वगैरे नृत्य प्रकार शिकताना प्राथमिक स्तरावरच्या त्या त्या कलेचे शास्त्रीय ज्ञान काहीवर्षेतरी घ्यावेच लागते . तरच गायन, वादन, नर्तन या कलांमध्ये कौशल्य आत्मसात करता येते. त्याप्रमाणेच संस्कृत भाषा अवगत व्हावी असे वाटत असेल तर विद्यार्थ्यांनी संस्कृत भाषेचे व्याकरण शिकावे. संस्कृत भाषेतील बारकावे समजून घ्यावेत. केवळ परीक्षेत मार्क वाढावेत एवढेच तात्पुरते उद्दिष्ट न ठेवता भविष्यात संस्कृत विषयात आणखी काही करावेसे वाटले तर या प्राथमिक ज्ञानाचा खूप उपयोग होतो.
                 संस्कृतमध्ये फक्त काव्ये, नाटके,सुभाषितेच नाहीत. पदार्थविज्ञानशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, खगोलशास्त्र, ज्योतिष, कृषीशास्त्र, स्थापत्यशास्त्र, वास्तुशास्त्र, आयुर्वेद, तत्त्वज्ञान अशा कितीतरी विषयांचे ज्ञानभांडार भरलेले आहे. ते जाणून घेण्यासाठी मूळ संस्कृत भाषा शिकली तर हे विषय चांगले जाणून घेता येतील.
                हळदीचे पेटंट मिळवितांना अमेरिकेशी टक्कर द्यावी लागली होती. डॅा. रघुनाथ माशेलकरांनी संस्कृत तज्ज्ञांकडून प्राचीन संस्कृत वाड्.मयातील हळदीचे सर्व संदर्भ पुराव्यानिशी समजून घेतले आणि ते सर्व सादर केले. त्याची प्राचीनता व सत्यासत्यता पडताळून पाहूनच मग हळदीचे पेटंट भारत सरकारला मिळाले.डॅा. माशेलकरांना हे गौरवास्पद आहेच, तसेच ते भारत देशाला आणि संस्कृत भाषेलाही अभिमानास्पद असेच आहे.
                आज तरुण विद्यार्थी चायनीज, जॅपनीज, जर्मन, फ्रेंच, रशियन वगैरे परदेशी भाषा शिकत आहेत. परदेशातीलही अनेक तरुण संस्कृत भाषा शिकतआहेत. परदेशातील काही विद्यापीठांमध्ये संस्कृत भाषा शिकविली जात आहे. आज ती गरज सर्वांना पटली आहे. मात्र शालेय पातळीवर संस्कृत भाषा व्याकरणासह अभ्यासली गेली तर आपल्या संस्कृत भाषेतील ज्ञान दुसर्या भाषांमध्ये अनुवादीत किंवा भाषांतरीत करणे सुलभ होईल आणि जुन्या ग्रंथातील आवश्यक ज्ञान इतरांपर्यंत पोहोचवतां येईल.
                 संस्कृत पुराणकथांवर आधारित अशा आपल्या प्रतिभेचा साज चढवून नव्या कलाकृती इंग्रजी भाषेत प्रकाशित होत आहेत आणि त्या लोकप्रियहीहोत आहेत. पण अनेकवेळा मूळ संस्कृत ग्रंथ अभ्यासण्यासाठी लागणारे संस्कृत विषयाचे ज्ञान सर्वांना असतेच असे नाही. म्हणून मूळ कलाकृती समजून घेण्यासाठी संस्कृत भाषा अवगत होईल इतके तरी संस्कृत भाषेचे ज्ञान लेखनकर्त्याजवळ असायला हवे म्हणजे आपले अनुवाद किंवा आधाराला घेतलेल्या कलाकृतींचे परिपूर्ण ज्ञान असले तर आपली कलाकृतीही परिपूर्ण अवस्थेपर्यंत नेता येईल.
               पालकांनी, शिक्षकांनी, हितचिंतकांनी विद्यार्थ्यांना संस्कृत भाषेचे हे दीर्घकालीन फायदे समजाऊन सांगितले तर सदस्य:स्थितीतही विद्यार्थी संस्कृत भाषेचा अभ्यास आवडीने करतील. त्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये संस्कृत भाषा शिकण्याची आवड निर्माण करण्याची जबाबदारी सर्वस्वी शाळा, शाळेतील शिक्षक, महाविद्यालये, महाविद्यालयांमधील प्राध्यापक आणि पालकांची आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*