“संस्कृत शिकताना व शिकवताना” या विषयावर सौ. श्रावणी माईणकर हीने “वृत्तल्लरी” साठी लिहीण्यास सांगितले. खरं म्हणजे माझे विद्यार्थी व माझे गुरु हा विषय माझ्या अत्यंत जिव्हाळ्याचा आहे. कारण माझ्या आयुष्यात अनेक चांगले आनंदाचे क्षण मी माझ्या गुरु व शिष्यांमुळेच अनुभवले आहेत. आजही अनुभवत आहे. मी प्रथम सुरूवात करते “संस्कृत शिकताना” या विषयापासून. या लेखमालेचे शीर्षक वाचताक्षणीच अनेकानेक प्रसंग माझ्या डोळ्यासमोरून सरकू लागले.
माझा संस्कृतशी परिचय मी चार पाच वर्षांची असतानाच झाला. माझ्या वडीलांनी मला सर्वात आधी “कराग्रे वसते…”, “गुरुर्ब्रह्मा…”,“समुद्रवसने देवी…” हे संस्कृत श्लोक शिकवले आणि नंतर संस्कृत सुभाषिते पाठ करून घेतली. त्यांचे आवडते सुभाषित त्यांनी प्रथम माझ्याकडून पाठ करुन घेतले. ते होते –
‘उद्यमेन हि सिध्यन्ति कार्याणि न मनोरथै: |
न हि सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखं मृगा:।।‘
याचा अर्थ त्यांनी मला समजून सांगितला. जो मी अजून विसरले नाही. माझ्या वडीलांनी संगितलेला अर्थ माझ्या मनावर कोरला गेला आहे आणि आजही मला तो जसाच्या तसा आठवतो.
मला अनेक लोक विचारतात की तुम्ही संस्कृतच्या वेगवेगळ्या संस्था, सामाजिक संस्था, तुमचे ६ वी ते १२ वी चे संस्कृतचे वर्ग…. एवढे सर्व कसे करता ? तुम्ही थकत नाही का ?
आणि त्याचे उत्तर सहजपणे माझ्या तोंडून “नाही” असे येते. या लॉकडाउनच्या काळात गेले ६ महीने मी घरातून बाहेर पडले नाही. परंतु मला एक क्षणही कंटाळा आला नाही की वेळ कसा घालवू असा यक्षप्रश्न उभा राहीला नाही आणि त्याचे एकमेव कारण म्हणजे संस्कृतने माझ्यावर केलेले संस्कार !
माझे वडील कै. द्वारकानाथ तायडे हे सतत काम करायचे. ते म्हणत, “मुझे थकनेकी फुर्सत ही नहीं है।“ अशा या परिश्रमशील, उर्जावान असलेल्या माझ्या वडीलांनी श्लोकांचा, सुभाषितांचा अर्थ मला बालवयात समजेल अशा छान सोप्या शब्दांत वेगवेगळ्या गोष्टींच्या आधारे सांगितला.
जसजशी मी मोठी होत गेले मला त्या श्लोकांचा, सुभाषितांचा अर्थ अधिकाधिक समजत गेला. आजही मला “कराग्रे वसते लक्ष्मी:…:” हा श्लोक म्हणताना माझा थकवा, मनाला आलेली ग्लानी-निराशा हळहळू दूर होते आणि मीच माझ्या जीवनाची शिल्पकार आहे हा विचार निश्चयात रुपांतरीत होऊन एक वेगळीच ऊर्जा माझ्यात निर्माण होते आणि मी कामाला लागते. “गुरुर्ब्रह्मा…” हा श्लोक म्हणताना गुरुंची थोरवी आणि आपल्या आयुष्यातील त्यांचे मोलाचे स्थान लक्षांत येते. (मला संस्कृत शिकताना अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्तींनी प्रत्यक्ष- अप्रत्यक्षपणे मदत केली. त्यांच्या विषयी मी या लेखात पुढे सांगितले आहे). “समुद्रवसने लक्ष्मी:…” म्हणताना पृथ्वीची सर्जनशीलता, क्षमाशीलता, तिचे लोभस रूप, तिच्या अस्तित्वावरच आपले अस्तित्व अवलंबून असणे इ. तिची थोरवी लक्षात येते व पंचमहाभुतांपुढे मी नम्र होते. “उद्यमेन…” हे सुभाषित मला नेहमी कार्यप्रवण करते. याच सुभाषिताला अनुसरून अर्थ असलेले इंग्लिश सुवचन असे आहे – Every morning a gazelle wakes up. It knows it must run faster than the fastest lion or it will be killed. Every morning a lion wakes up. It knows it must outrun the slowest gazelle or it will starve to death. It doesn’t mater whether you are a lion or gazelle.
श्रीमंत-गरीब, सुशिक्षित-अशिक्षित, सबल-दुर्बल कोणीही असा, प्रत्येकाला या जगात कष्ट करावेच लागतात हा श्रमसंस्कार माझ्यावर आपोआप झाला.
अशा तऱ्हेने माझ्या वडिलांनी मला अनेक सुभाषिते शिकविली. पंचतंत्र, रामायण, महाभारत यातील गोष्टी सांगितल्या व आचार-विचार-उक्ति चांगली ठेवण्यास प्रवृत्त केले. जीवनभर विद्यार्थी-ज्ञानार्थी राहण्याचा संस्कार रुजवला.
शाळेत असताना श्री. वर्तक सरांनी मला संस्कृत छान शिकवले. असंख्य अपठित गद्य-पद्य उतारे त्यांनी मला शिकविले. त्यामुळे संस्कृतची गोडी वाढली.
बी.ए. झाल्यावर ३० वर्षे संस्कृतशी माझा संबंध नव्हता. पण नंतर एकदा अशीच मी वर्तमानपत्रांची रद्दी काढत असताना एका छोट्या बातमीकडे सहज लक्ष गेले. सौ.तरंगिणी खोत यांच्या शिक्षक प्रशिक्षण वर्गाची ती बातमी होती. मी त्या वर्गाला जाण्याचे ठरविले. त्या वर्गात मा. वीणाताई गोडबोले, विनोदिनीताई जोशी, श्री. जगदीश इंदुलकर यांनी संस्कृत व्याकरण शिकविले. प्रीती करंदीकर यांनी संस्कृत संभाषण शिकवले. संस्कृत मधून संभाषण करणे हे माझ्यासाठी खूप नवीन होते. संभाषण करताना मला खूप अप्रूप वाटायचे. डॉ. मंजुषा गोखले यांनी रसग्रहणावर दोन व्याखाने दिली. ती मला इतकी आवडली कि मीही तेथील तोंडी परीक्षेत इ. १० वी च्या पुस्तकातील एका धडयाचे रसग्रहण केले आणि मला त्यात प्रथम क्रमांक मिळाला व बक्षीस मिळाले विद्यार्थ्यांना शिकविण्याआधी आपण कशी तयारी करावी, फळ्यावर काय व कसे लिहावे, प्रश्न कसे काढावेत, प्रश्नपत्रिका कशी तयार करावी हे सर्व मी त्या वर्गात शिकले. इ. ८ वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी मला या वर्गाचा खूप उपयोग झाला. तेंव्हापासून संस्कृतच्या पाठ्यपुस्तकातील धड्यांचा मी सखोलतेने अभ्यास करू लागले.
त्यानंतर लगेच संस्कृत भाषा संस्थेचे मी “संस्कृत-भाषा-साधना” व “संस्कृत-साहित्य-साधना” हे दोन वर्ग केले तेथे सौ. सुरेखाताई जोशी, सौ. संध्याताई मिरवणकर, डॉ. तन्मय अमलाडी व श्री. वसंत डुबे यांनी व्याकरण, कवी श्रेष्ठ कालिदासाचे मेघदूत, भर्तृहरीचे नीतिशतक, साक्षात श्रीकृष्णाच्या मुखातून प्रकटलेली भगवद्गीता, भासाचे स्वप्नवासवदत्तम, बाणभट्टाची कादंबरी इ. साहित्य इतके छान शिकवले की घरचे सर्व काम करून, शिकवण्या करून मी रात्र रात्र जागून अभ्यास केला. या सर्वांनी शिकविताना प्रत्येक शब्दाची फोड करून सांगितली कवीचा कल्पनाविलास निदर्शनास आणून दिला सामाजिक-मानसशास्त्रीय-भौगोलिक इ अनेक दृष्टिकोन त्यांनी उलगडून दाखविले त्यामुळे येथे संस्कृत शिकताना मी आनंदविभोर होत असे.
या वर्गात संस्कृत शिकत असताना माझ्या जीवनात दोन अत्यंत दुःखद घटना घडल्या माझ्या वडिलांचे व माझ्या पतीचे निधन झाले. तेंव्हा संध्याताई व सुरेखाताई यांनी माझ्या जीवलग मैत्रीणी बनून मला धीर दिला. त्याच वेळेला माझी परीक्षा होती. संध्याताई तेंव्हा माझ्या घरी आल्या व त्यांनी मला पेपर लिहीण्यास सांगितला व स्वतः दोन तास बसल्या. नाहीतर माझे एक वर्ष वाया गेले असते व पुन्हा मी परीक्षा दिली असती की नाही माहित नाही. पण या दोघींमुळे मी परीक्षा दिली व प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले.
या शिक्षकांच्या शिकविण्याने व जिव्हाळयामुळे मी वयाच्या ५१ व्या वर्षी हे यश संपादन करू शकले. हे चौघेही अत्यंत समरसून संस्कृत साहित्य शिकवत. वर्गात शिकवलेल्या भागावर विद्यार्थ्यांना सराव होण्यासाठी भरपूर प्रश्न कसे काढावेत हे मी डॉ अमलाडी सरांकडून शिकले. आणि असे सरावासाठी मी सुद्धा अनेक प्रश्न काढत असे. हे सर्व प्रश्न मी संकलित केले व संस्कृत प्रेमींसाठी “अभ्यासपुस्तिका” हा अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना अत्यंत उपयुक्त ठरली आहे. सुरेखाताई, संध्याताई व डॉ. अमलाडी सरांनी मला लगेच तेथे शिक्षक म्हणून नेमले व तेंव्हापासून आजपर्यत मी संस्कृत भाषा संस्थेचे ७२ तासात संस्कृत हा सहा महिन्यांचा संस्कृतभाषा साधना हा वर्ग दादर येथे चालवते व सध्या ऑनलाईन शिकवतॆ. मी मनापासून या चौघांबद्दल कृतज्ञता व्यक्त करते. कारण अजूनही मी त्यांच्याकडून संस्कृत शिकते.
संस्कृत भाषा संस्थेचे मा. श्री. अत्रे सर यांनी मला संस्थेची प्रथम सचिव बनविले व नंतर त्यांनीच मला उपाध्यक्ष बनविले त्याबद्दल त्यांची कृतज्ञ आहे. संस्कृतभाषा संस्थेचे संस्थापक कै.ग.वा.करंदीकर सरांचेही मला खूप मार्गदर्शन लाभले. त्यांच्या बोलण्यातील मार्दव, माझ्यासारख्या नवख्या संस्कृत अध्ययन करणाऱ्या व्यक्ती बद्दलचा आदर, संस्कृतभाषेचा प्रचार आणि प्रसार करण्याचा ध्यास, स्कृतचा अभ्यास सोपा व्हावा म्हणून केलेले लेखन, प्रकाशित केलेली पुस्तके, “७२ तासांत संस्कृत” ही अत्यंत नाविन्यपूर्ण कल्पना राबविण्यासाठी केलेले परिश्रम हे सर्व मला अत्यंत प्रेरणदायी वाटते व मी सुद्धा संस्कृतीचा प्रचार करण्यासाठी “कृतनिश्चया” झाले. मी गेली १५-२० वर्षे अत्यंत आनंदाने ७२ तासात संस्कृत म्हणजेच संस्कृतभाषासाधना वर्ग चालवीत आहे. संस्कृतभाषासंस्थेच्यास्थापनेपासून करंदीकर सरांना सहाय्य करणारे पं. गुलाम दस्तगीर बिराजदार व मा. वीणाताई गोडबोले यांनी पुन्हा सुरेखाताईंना अध्यक्ष व मला उपाध्यक्ष केले.
या सर्वांचा विश्वास सार्थ करण्यासाठी मी सतत संस्कृतचा स्वतः अभ्यास करत असते व विद्यार्थ्यांना आधिकाधिक चांगल्या तऱ्हेने शिकविण्याचा प्रयत्न करते.
क्रमश:
Be the first to comment