एखाद्या गोष्टीचा अभ्यास सुरू केला की त्यातल्या विद्वानांची नावे कानी पडू लागतात. जे आपल्यापेक्षा सीनियर असतात त्यांच्या तोंडून “आमच्या वेळी…” अशा शब्दांनी सुरुवात होऊन त्यावेळच्या एकसे एक शिक्षकांचे वर्णन सुरू होते. अशावेळी मनातून खट्टू व्हायला होतं. आपण जरा उशिरा शिकायला सुरुवात केली असे वाटते. मात्र संस्कृतचा अभ्यास सुरू केल्यावर मी बर्यापैकी सुदैवी ठरलो. अगदी ओल्ड स्कूलचे म्हणता येतील असे शिक्षक मला लाभले. डॉ. गौरी माहुलीकरांनी मला शिकवलं. आणि त्याच प्रभावळीतल्या डॉ. परिणीता देशपांडे यांच्याकडून भामहाच्या काव्यालंकाराची ओळख झाली. त्यांनी आम्हाला ध्वनी सिद्धांत शिकवला. समाजशास्त्राचा कटू अनुभव गाठीशी असल्याने (तेथील काही सन्माननीय अपवाद वगळता) शिक्षकाच्या प्रेमात कधीकाळी पडता येईल असं वाटलं नव्हतं. मात्र आम्ही देशपांडे बाईंच्या शिकवण्यावर लुब्धच झालो. काही माणसे नेहमी शुचिर्भूत दिसतात. त्यांच्या दर्शनानेच आपल्याला उत्साह वाटतो. असे व्यक्तिमत्त्व लाभलेल्या देशपांडे मॅडम सावकाश वर्गात येत. आपली बॅग ठेवीत. बॅगेतून पाणी काढून शांतपणे पीत. मग चष्मा लावून आपल्या नोट्स काढीत. आणि वर्गाला सुरुवात होत असे. सुरुवातीला हळू असणारा त्यांचा आवाज हळूहळू तापत जात असे. मग तो वर्गात घुमू लागे. आणि संस्कृतचं गारूड सुरू होत असे. छोट्याश्या सूत्राचे निरनिराळ्या दृष्टिकोनातून सांगोपांग स्पष्टीकरण त्या करीत असत. त्यानंतर आमच्या शंकांची उत्तरे देत. वर्गात हा विषय घेतलेले आम्ही तिघेच होतो. पण त्यांचा उत्साह कधीच कमी झाला नाही. प्रत्येक वाक्याचे अनेक संदर्भ त्या देत असत. पुढे त्यांची व्याख्याने ऐकण्याचा योग आला आणि त्यांच्याबद्दलचा आदर वाढतच गेला. यावेळी ऋतायन संस्थेने महाकाव्याच्या रसास्वाद वर्गात त्यांचे रघुवंशावर पहिलेच व्याख्यान ठेवले होते. ही सुवर्णसंधी मला गमवायची नव्हतीच आणि व्याख्यान ऐकल्यावर कालिदास आणि रघुवंशाइतकाच देशपांडेमॅडमनाही दंडवत घालावासा वाटला.
सुरुवातीलाच बाईंनी कालिदासाबद्दल काही अत्यंत मार्मिक विधाने केली. आपल्याकडे एखादा विद्वान कुठल्या भागातील आहे इथपासून ते त्याच्या वर्ण, जातीपर्यंत सर्वच गोष्टींची छाया कळत-नकळत त्याच्या विद्वत्तेचे मूल्यमापन करताना पडलेली दिसते. मात्र सुदैवाने कालिदासाच्या बाबतीत हे घडले नाही. कारण त्याच्याबद्दल फारशी वैयक्तिक माहिती उपलब्ध नाही. ज्या आहेत त्या दंतकथा आहेत, ज्यातून कालिदासाचेच श्रेष्ठत्व दिसून येते. कालिदासाच्या साहित्यातील घटनांवरुन, त्यातील प्रदेशांच्या वर्णनांवरून अनेकांनी तो मूलतः कुठल्या प्रदेशातील असावा असे आडाखे बांधण्याचा प्रयत्न केला आहे. कालिदास बिंबफलाची उपमा सुंदर स्त्रीच्या ओठांसाठी वापरताना दिसतो. हे बिंबफल उत्तर प्रदेश, बिहार प्रांतात वैपुल्याने आढळते म्हणून ती मंडळी हा आमचा कालिदास असे म्हणतात, तर कालीमातेचा दास म्हणून बंगाली आपला हक्क त्यावर सांगतात. उज्जयिनीच्या भगवान महाकालेश्वराचा भक्त म्हणून तो उज्जयिनीचा निवासी वाटतो, तर मेघदूतातील रामगिरी, विदर्भाच्या उल्लेखामुळे शिवाय वैदर्भी शैलीच्या पुरस्कारामुळे तो त्या प्रदेशातील वाटतो. कालिदासावर प्रत्यभिज्ञा या काश्मिरी मताचा प्रभाव जाणवतो, शिवाय त्याची हिमालयाबद्दल असलेली आपुलकी तर त्याने हिमालयाला नगाधिराज म्हणून संबोधल्याने सर्वश्रुत झाली आहे. त्यामुळे तो काश्मीरातील असावा असेदेखील वाटते. मात्र कालिदास हा सृजनाच्या शक्तीचा दास आहे असे सांगून देशपांडे बाई म्हणाल्या की कालिदास आकळला हे म्हणण्याचं धारिष्ट्य कुणीही करु नये इतकं त्याचं साहित्य गहन आहे. बाईंनी आम्हाला अलंकारशास्त्राची ओळख करुन दिली तेव्हाही हे मला जाणवलं होतं की त्यांचे प्रतिपादन हे नेहेमी रसपूर्ण असते. कालिदासाबद्दलची ही माहिती त्यांच्या अफाट संशोधनाची चुणूक दाखवून देणारी होती, मात्र ती त्यांनी शुष्क रीतीने सांगितली नाही. हे संपूर्ण व्याख्यान असेच रसाने ओतप्रोत होऊन रंगले. आमच्यासारख्या “रस के भिकारी” असणार्यांना अर्थातच ही पर्वणी होती.
पुढे कालिदासाबद्दल बोलताना त्यांनी काव्यशास्त्रातील काही महत्त्वाच्या संकल्पनांना हात घातला. मग त्यांनी काहीवेळा आनंदवर्धनासारख्या काव्यशास्त्रज्ञांचा उल्लेख केला तर काहीवेळा त्यातील काही परंपरांबद्दल त्या बोलल्या. कालिदासाच्या प्रतिभेबद्दल बोलताना त्या म्हणाल्या की शब्द आणि अर्थासाठी कवी काही नवीन घडवत नसतो. शब्द अनेकजण वापरतात तेच कवीदेखील वापरतो. अर्थ तर परंपरेने आलेलेच असतात. प्रतिभा ही शब्दांच्या विशिष्ट योजनेचा चमत्कार असतो. हे शब्द ज्याच्या तोंडून येतात त्याची ही प्रतिभा महत्त्वाची. हे सांगताना कालिदासाच्याच कुमारसंभवातील अतिशय सुंदर उदाहरण त्यांनी दिले. नारद पार्वतीसाठी शंकराचे स्थळ घेऊन हिमालयाकडे आले आहेत. त्यांचे बोलणे ऐकून पार्वती लाजेने हातातील कमळाच्या पाकळ्या मोजते. नवथर तारुण्यातील ही भावना कालिदासाने आपल्या प्रतिभेने शिखरावर पोहोचवली आहे. त्याच्या काव्याला व्यंजनेचा आधार आहे. म्हणजे फक्त शब्द, त्याचा लौकिक अर्थ किंवा शब्द आणि त्याचा सूचक अर्थच नव्हे तर त्याही पलीकडे वेगळ्या अर्थाची प्रचिती करुन देणारे असे कालिदासाचे काव्य आहे. त्यात अर्थाच्या आणि भावभावनांच्या लडिवाळ गोष्टी सुरू राहतात. मात्र हे सांगतानाच कालिदासाच्या काव्याचा आस्वाद घ्यायचा तर रसिकसुद्धा त्या तयारीचा असला पाहिजे हे ही बाईंनी आवर्जून सांगितले. काव्यशास्त्रात रसिकाला “सहृदय” असे सुरेख नाव आहे. जशी कवीकडे निर्मितीची, सृजनाची प्रतिभा असते, ज्यास निर्मात्री प्रतिभा असे म्हणतात तसेच सहृदयाकडेदेखील प्रतिभा असणे आवश्यक आहे. ही प्रतिभा काव्याचे सतत अनुशीलन करुन येते. मनाचा आरसा स्वच्छ हवा तरच कविच्या प्रतिभेचे आकलन सहृदयाला घडू शकते. सहृदयाच्या या प्रतिभेला भावयित्री प्रतिभा असे म्हणतात अणि या प्रतिभेला जो फुलवतो तो श्रेष्ठ कवी. बाईंचे हे सारे प्रतिपादन ऐकताना मला आमचे अलंकारशास्त्राचे वर्ग आठवत होते.
व्याख्यानाचा विषय जरी रघुवंश होता तरी बाईंचा कालिदासाविषयीचा आदर आणि प्रेम इतकं होतं की पुन्हा पुन्हा त्या कालिदासाचे गुणवर्णन करण्यात रंगून जात होत्या. रघुवंशाबद्दल सांगताना पुन्हा त्या संशोधकाच्या भूमिकेत शिरल्या. एकोणीस सर्गांच्या या महाकाव्यावर जवळपास पस्तीस टीका लिहिल्या गेल्या आहेत. संस्कृत वाङमयात एखाद्या साहित्यकृतीवर लिहिल्या गेलेल्या टीकांची संख्या हे त्याच्या यशस्वितेचे एक महत्त्वाचे गमक असते. शिवाय संस्कृत साहित्याचे ज्याला पंचप्राणच म्हणावेत अशा पंचमहाकाव्यांमध्ये रघुवंशाचा समावेश केला जातो. संस्कृत वाङमयात काही संकेत पाळले जातात. दु:खान्त दाखवू नये हा त्यातील एक महत्त्वाचा संकेत. काव्याचा आस्वाद घेणारे, नाटक पाहायला येणारे या सर्व रसिकांना आनंदच मिळावा अशी ही भूमिका आहे. रघुवंशाच्या पहिल्या सर्गात दिलीप राजाला मिळालेल्या शापाचा उल्लेख आहे त्यामुळे परंपरेप्रमाणे रघुवंशाचा पाठ करताना पहिल्या सर्गापासून पाठ करीत नाहीत. रघुवंश या नावाबाबत बाई म्हणाल्या की कालिदास वाल्मिकींना मानतो. रामायणात दोनवेळा रघुवंश शब्दाचा उल्लेख आला आहे. रघुवंशाच्या सुरुवातीलाच कालिदासाची शिवभक्ती अधोरेखित करणारे शंकराचे वर्णन करणारे मंगलाचरणाचे श्लोक आहेत. पुढे नम्रतेची पराकाष्ठा करीत कालिदास म्हणतो की सूर्यवंशाचे वर्णन करण्याचे धाडस कसे करावे? पण वाल्मिकींनी हिर्यासारख्या तेजस्वी वंशाला वेज पाडले आहे. माझे काम त्यातून सुतासारखे सरळ बाहेर पडण्याचे आहे. कालिदासाची नम्रतादेखील अलौकिक उपमेचे वस्त्र लेवूनच समोर येते. रघुवंशात अठ्ठावीस राजांचा उल्लेख आहे. हे सारे राजे एकाच वंशाशी निगडीत असले तरी त्यांची स्वतःची काही वैशिष्ट्ये आहेत. हे एकाच छापाच्या गणपतीप्रमाणे नाहीत. तरीही त्यांच्यात काही साम्य आहे. सर्वांना आजन्म ध्यास आहे तो शुद्धीचा. अठ्ठावीस राजांच्या उल्लेखामुळे हे काव्य अनेक नायकांचे झाले आहे. हा जणू काही सौंदर्यपूर्ण लेण्यांचा समूहच आहे.
अशा या रघुवंशाबद्दल बोलताना बाईंनी पुढे संशोधन आणि मार्मिकतेचा वस्तुपाठ दाखवताना ते रसपूर्ण कसे करावे याचेच जणू प्रात्यक्षिक देत विवरण केले. कालिदासाला सूर्यवंशातील राजांच्या वंशावळीत रघुराजाचे चरित्र इतर महान राजांच्या तुलनेने अजोड वाटले असणार म्हणुन काव्याचे शीर्षक रघुवंश. मात्र अशा महान वंशात अग्निवर्णासारखा भोगी राजा निपजला. रघू आणि अग्निवर्ण हे जणू या वंशाचे दोन ध्रुवच होते. अग्निवर्ण अतिभोगाने क्षय होऊन मरण पावला. राजाच्या दर्शनासाठी प्रजा भेटायला आल्यास तो आपला पाय फक्त गवाक्षातून काढून दाखवित असे इतका तो भोगात लिप्त होऊन बेदरकार झाला होता. ज्या रघुवंशात दिलीप, रघू, अज, दशरथ, राम असे राजे जन्मले त्यातच अग्निवर्णदेखील जन्मावा हा दैवदुर्विलासच. पण कलिदासाने “चक्रनेमिक्रमेण” म्हटले आहेच. उन्नती अवनतीचे चक्र सुरु असते. कुठलीही अवस्था कायम नाही. आणि त्यातून रघुवंशासारख्या दैवी झळाळी असलेल्या वंशाचीदेखील सुटका नाही. मात्र या अग्निवर्णामुळेच रघुवंशाबद्दल विद्वानांमध्ये काही वादसुद्धा निर्माण झाले आहेत. अग्निवर्ण हा रघुवंशातील शेवटचा राजा नाही. त्यानंतर आठ राजे आहेत ज्यांचा या महाकाव्यात उल्लेख नाही. हे काव्य अग्निवर्णाबद्दल सांगून अचानक संपल्यासारखे वाटते. एकोणीस सर्गांचे हे महाकाव्य मुळात पंचवीस सर्गांचे असावे असे एक मत आहे. अग्निवर्णानंतरचे राजे हे फारसे कर्तृत्ववान नसावेत त्यामुळे कालिदासाने त्यांचा उल्लेख केला नसावा असेही एक मत आहे. महान अशा रघुवंशाचा संपूर्ण र्हास अग्निवर्णानंतर झाला असावा आणि पुढे काही सांगण्यासारखे शिल्लकच राहिले नसावे म्हणून कालिदासाने तेथेच काव्याची समाप्ती केली असावी असेही मानणारी मंडळी आहेत. काहीही असो. मात्र कालिदासाने सुखदु:खाच्या सतत फिरणार्या चक्रातून कुणाचीही सुटका नाही हे आपले तत्त्वज्ञान येथेही अधोरेखित केले आहे हे नक्की.
बाईंनी रघुवंशातील राजांचा धावता आढावा घेत त्यांची काही वैशिष्ट्ये सांगितली. जसे कर्तव्यकठोरता हे दिलीप राजाचे वेशिष्ट्य, तर दानशूरपणा हे रघूचे, काहीसा हळवा असलेला अज, तर धीरगंभीर राम. या सार्यांच्या वर्णनात कालिदासाची सूक्ष्म दृष्टी दिसतेच शिवाय त्यांच्या पत्नींचे वर्णन करतानाही स्त्रीस्वभावाच्या बारीकसारीक छटा कालिदास दाखवतो. दिलीप राजाची सुदक्षिणा, अजाची इंदुमती, रामाची सीता या आपापले वेगळेपण घेऊन रघुवंशात येतात. हे सारे घडत असतानाच “उपमा कालिदासस्य” या उक्तीचा रसिकाला प्रत्यय येतो. रघुवंशात कालिदासाने चंद्राच्या जवळपास पंचेचाळीस उपमा दिल्या आहेत आणि त्यात कुठेही पुनरुक्ती नाही. पहिल्या एक-दोन सर्गात दिलिप राजाबद्दल सांगताना आश्रमीय वातावरण समोर उभे राहील अशा उपमांची पखरण आहे. दिलीपाला चंद्राची उपमा देताना शुभ्र अशा क्षीरसागरातून चंद्र जन्मावा तसा दिलीपाचा जन्म झाला असे कालिदासाने म्हटले आहे. बाईंनी या उपमेबद्दल बोलल्यावर मला त्यांनी शिकवलेल्या ध्वनिसिद्धांताची आठवण झाली. कालिदासाच्या उपमांमधले ध्वनी पाहू जाता अनंत शक्यता तेथे आढळतात. दिलीपाला दिलेल्या चंद्राच्या उपमेत चंद्राचे सौंदर्य, त्याची शीतलता, त्याचा सौम्यपणा, त्याचे आकर्षण, क्षीरसागराची शीतलता, त्याचे पावित्र्य अशा कितीतरी छटा कलिदास दाखवून देतो. राम आणि परशुराम प्रसंगवर्णनात कालिदासाने रामाला चंद्राची तर परशुरामाला सूर्याची उपमा देऊन दोघांचे व्यक्तिमत्वच अधोरेखित केले आहे. या सार्यात दिसते काय तर कमीतकमी शब्दात जास्तीत जास्त आशय सांगणारी कालिदासाची आशयघन भाषा. ज्यामुळे संस्कृत साहित्याचा समृद्ध वारसा अनेक पटींनी समृद्ध झाला. पुढे बोलताना बाई कालिदासमय होऊन म्हणाल्या की शब्दांचे भावांशी अनुबंध जोडावेत ते कालिदासानेच. आणि आपल्या कालिदासाविषयीचा आदराचा कळस गाठताना त्या म्हणाल्या खुद्द पाणिनीलासुद्धा व्याकरण रचल्याची धन्यता वाटावी अशी कालिदासाची भाषा आहे.
पुढे बाईंनी रघुवंशाची सर्गागणिक वैशिष्ट्ये सांगितली. रघुवंशाचा पाचवा सर्ग प्रत्यक्ष सरस्वतीनेच लिहिला आहे अशी दंतकथा आहे इतका तो अलौकिक उतरला आहे. यात रघुराजाने कौत्साला चौदा कोटी सुवर्णमुद्रा दान केल्याची कथा आहे. शिवाय त्यातच इंदुमतीच्या स्वयंवरासाठी आलेल्या रघुपुत्र अजाचे वर्णन आहे. तो विदर्भदेशी येऊन रात्री विश्रांती घेतो आणि पहाटे त्याला उठवताना कालिदासाने अगदी रामप्रहराची पहाट आणि मग सकाळ कशी होते त्याचे मनोहारी वर्णन केले आहे. हे करीत असतानाच पुन्हा रघुवंशी राजांच्या पराक्रमाचे दाखले कालिदास देतच असतो. अशाच एका मार्मिक दृष्टांन्तात कालिदास म्हणतो भगवान सूर्याच्या उदयाआधी त्याचा सारथी अरुण अंधःकार दूर करतोच. आणि ते बरोबरच आहे. योग्य सेवक असताना स्वामीने स्वतः कार्य करण्याचे कष्ट घेण्याची आवश्यकता नसते. त्याचप्रमाणे युद्धात सर्वांच्या पुढे राहून लढणारा आपल्यासारखा पुत्र असताना महाराज रघूला स्वतः शत्रूंचा संहार करण्याची गरजच काय? तसेच रघुवंशातील तेराव्या सर्गाला बाईंनी “मिनी मेघदूत” म्हटले. कारण ज्याप्रमाणे मेघाला आपल्या पत्नीकडे जाताना वाटेत वरून काय काय दिसेल याचे वर्णन कालिदासाचा यक्ष मेघदूतात करतो तद्वतच रावणवधानंतर अयोध्येला पुष्पक विमानातून परतताना राम सीतेला प्रवासात खाली दिसणार्या स्थलांचे वर्णन करुन सांगतो. या परतीच्या प्रवासात राम वनवासाची चौदा वर्षे पुन्हा जगला आहे. या तेराव्या सर्गाला बाईंनी रघुवंशाचे लावण्योपनिषदच म्हटले. मात्र अशा अनेक जागा रघुवंशात आहेत. दिलीप राजा पुत्रप्राप्तीसाठी नंदिनी गायीची सेवा करीत असताना कालिदासाने अरण्याचे मनोरम वर्णन केले आहे. येथे बाई कालिदासाच्या वर्णनात चित्रकाराची सौंदर्यदृष्टी आहे असे म्हणाल्या. या वर्णनात एका ठिकाणी हरिणींनी जेव्हा धनुष्य धारण करूनदेखील दयाभाव धारण करणार्या दिलीपाला पाहिले तेव्हा आपले लोचन विशाल असण्याचे फल प्राप्त केले असे कालिदास म्हणतो. विशाल नेत्रांचे सुयोग्य फल काय तर दिलीपासारख्या राजाला पाहणे! अशा तर्हेची कालिदासाच्या उत्तुंग प्रतिभेची झेप दाखवणारी अनेक स्थळे बाईंनी उलगडून दाखवली.
कालिदासाच्या रघुवंशाचे व्याख्यान सुरू असताना ज्यामुळे कालिदासाला दीपशिखी कालिदास म्हणून नावाजले गेले त्या प्रसंगाचा उल्लेख होणारच होता. सहाव्या सर्गातील इंदुमतीच्या स्वयंवराचा प्रसंग. अनेक राजे त्या स्वयंवरासाठी आले होते आणि इंदुमतीच्या प्राप्तीची उत्कट इच्छा धरुन तेथे विराजमान झाले होते. अशावेळी एकेका राजाच्या समोरुन इंदुमती पुढे सरकत होती. या घटनेचे वर्णन करताना कालिदास म्हणतो रात्री राजमार्गावरुन जेव्हा दीपशिखा पुढे सरकते तेव्हा उजळलेला महाल जसा पुन्हा अंधाराने व्याप्त होतो त्याचप्रमाणे ज्या राजांसमोरून इंदुमती पुढे जात होती ते राजे उदास होत होते. या एका उपमेने कालिदासाचे नाव संस्कृत साहित्यात दीपशिखी कालिदास म्हणुन प्रसिद्ध झाले. बाईंनी व्याख्यानाच्या शेवटास येताना रघुवंशातील अनेक घटनांवर आपली मार्मिक मते दिली. आणि ती देत असतानाच कालिदासाच्या शैलीचेही वेगळेपण सांगितले. चोखंदळपणे निवडलेले शब्द हे जसे कालिदासाच्या शैलीचे एक महत्त्वाचे व्यवच्छेदक लक्षण म्हणता येईल त्याचप्रमाणे त्या शैलीच्या योगाने होणारी अपूर्व रसनिष्पत्ती हे आगळेपण कालिदासात आहे. बाईंनी कालिदासाच्या अंगात रसाचे उपनिषद मुरले आहे असे म्हणुन कालिदासाच्या रसनिष्पत्ती करणार्या शैलीला अधोरेखित केले. या रंगलेल्या व्याख्यानातील बाईंचे एक वाक्य मात्र मला कधीही विसरता येणार नाही. त्यांनी कालिदासाबद्दल बोलताना त्याची एका ठिकाणी भवभूतीशी तुलना केली. कलात्मक संयम हा तर कालिदासाचा महत्त्वाचा गुण. सीतात्यागाच्यावेळी भवभूतीचा राम सात-आठ वेळा मूर्च्छित पडतो तर कालिदासाच्या रामाचे फक्त डोळे अश्रूंनी भरुन येतात. संस्कृत साहित्यात रामायण महाभारतासारखे ग्रंथ अनेक कवींसाठी प्रेरणा ठरले आहेत. मात्र त्यातील प्रसंग कविला “भावला” आणि त्यानंतर आपल्या साहित्यकृतीत त्याने तो कसा “निभावला” हे महत्त्वाचे असते. संस्कृत परंपरेतील एखादे आशयघन सूत्र असावे असे हे वाक्य होते. वैभव, चढती कळा आणि शेवटी विनाश यातून घडलेले रघुवंश आणि अशा रघुवंशाच्या व्याख्यानाचा विस्तृत पट आवरता घेताना बाईंनी कालिदासाची आपण दासी आहोत असे त्या नम्रपणे सांगून कालिदासाच्या त्यांनी मांडलेल्या पूजेची सांगता केली.
अतुल ठाकुर
अतिशय सुंदर लेखन..!! मी पुणे विद्यापीठाची माजी विद्यार्थिनी आहे, आणि पूर्वी मी बाईंचे व्याख्यान ऐकले आहे..या लेखात त्यांच्या व्याख्यानाचा खूप छान परामर्श घेतला आहे..